आनंदकृष्णन एस (वय २९) याने कोचीमध्ये आयटीची नोकरी स्वीकारली होती, तेव्हा साधारण सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्याने धूम्रपान सुरू केले होते. एक नवीन प्रोजेक्ट करत असताना दोन-तीन दिवसांच्या शिफ्टमध्ये त्याला काम करावे लागत होते, तेव्हा मित्र आणि सहकाऱ्यांना स्मोक-ब्रेक घेताना त्याने पाहिले होते. “जेव्हा तुम्हाला तुमच्या डेस्कवर बराच वेळ बसावे लागते, तेव्हाच काही वेळ ब्रेक आवश्यक असतो. म्हणून मी माझ्या धूम्रपान करणाऱ्या सहकाऱ्यांसह बाहेर जाण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मलाही धूम्रपानाची सवय झाली. आता जरी मी आयटी क्षेत्रात काम करत नसलो तरी मी ते थांबवू शकलो नाही,” असे त्याने द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

एकदा खोकताना रक्त आल्यानंतर त्याने धूम्रपान मनापासून सोडण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, “मी घाबरलो होतो, प्रत्येक वेळी काही दिवसांसाठी ब्रेक घेतो. पण, नंतर पुन्हा इच्छा होत असते. कामाच्यावेळी डेस्कवरून स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचा माझ्यासाठी हा एक मार्ग आहे.”

अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, “दरवर्षी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी १० टक्क्यांपेक्षा कमी लोक धूम्रपान प्रत्यक्षात सोडू शकतात.

धूम्रपान सोडणे इतके अवघड का आहे?

बरेच तरुण धूम्रपान सोडण्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीच्या विविध पद्धती वापरतात, ज्यात पॅचेस, स्प्रे, गम आणि लोझेंज यांचा समावेश होतो; ज्यामुळे तीव्र क्षणिक लालसा कमी करण्यात मदत होते. सवय सोडवण्याच्या खात्रीशीर मार्गासाठी, bupropion आणि varenicline सारखी औषधे डॉक्टरांद्वारे लिहून दिली आहेत.

अनेकदा लोत पार्ट्या, पब आणि कॅफे यांसारख्या ठिकाणी पुन्हा भेट देतात. अशा ठिकाणी सर्रासपणे धूम्रपान केले जाते किंवा तंबाखू चघळली जाते. ज्यांना धूम्रपान सोडायचे आहे ते लोकांसाठी अशा वातावरणात राहून धूम्रपान सोडणे कठीण होते.

कधीकधी तणावपूर्ण परिस्थितीदेखील धूम्रपान करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तज्ज्ञ शिफारस करतात की, तुम्हाला धूम्रपान करण्याची लालसा कशामुळे होते याचे कारण शोधून काढा आणि ते टाळण्यासाठी किंवा तंबाखू न वापरता पर्यायी मार्ग वापरण्यासाठी योजना तयार करा.

धूम्रपानाशी संबंधित वर्तणुकीची पद्धत हीच तुम्हाला धूम्रपानाची सवय लागण्याचे सर्वात मोठे कारण आहे. पुढच्या वेळी तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा होत असेल तर हार मानू नका आणि तुम्ही स्वतःला सिगारेट किंवा धूम्रपान केल्या जाणाऱ्या ठिकाणांपासून दूूर ठेवा.

सार्वजनिक स्मोक-फ्री झोनमध्ये राहा, साखर नसलेले च्युइंग गम किंवा शेंगदाणे चघळा (ते तुम्हाला धूम्रपान केल्याप्रमाणे गुंतवून ठेवते), फळांचा रस प्या किंवा फक्त धावा किंवा चाला, काही वॉल स्क्वॅट्स किंवा खुर्चीचा वापर करून व्यायाम करणे यांसारख्या छोट्या हालचाली करून पाहा.

आणि काहीही झाले तरी “फक्त एक सिगारेट” असे म्हणून धूम्रपान करण्याचा मोह ठेवू नका, ते फक्त तुमचे व्यसन आणखी वाढवते.

हेही वाचा – Heatwave alert : शरीराला थंडावा देण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती आहेत सर्वोत्तम, रोजच्या आहारात करा समावेश

ई-सिगारेट वापरणे धूम्रपानाची सवय का सोडवू शकत नाही?

ई-सिगारेटचा धूम्रपान थांबवण्याचे एक साधन म्हणून प्रचार केला जात असताना, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बहुतेक सिगारेटऐवजी ई-सिगारेटचा वापर सुरू करतात किंवा दोन्हीचा वापर करतात. ई-सिगारेटचा सिगारेटसारखा धूर होत नाही, त्यालाच ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट’ म्हणतात. ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही. ई-सिगारेटचा आरोग्यावर होणारा परिणाम अद्याप माहीत नाही. हे तुमच्या हृदय आणि फुफ्फुसासाठी वाईट असू शकते, असे नवीन संशोधनात समोर आले आहे.

आनंदकृष्णन यांनी सांगितले की, “मला वाटत होते की मला निकोटीनमुळे धूम्रपानाची इच्छा होत आहे, म्हणून मी ई-सिगारेट वापरण्याचा प्रयत्न केला. समस्या अशी होती की, मी माझ्या डेस्कवरच ई-सिगारेट वापरू शकतो, म्हणून मी ते अधिक वारंवार वापरत होतो आणि मला अजूनही स्मोक-ब्रेकची इच्छा होते.”

हेही वाचा – तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?

धूम्रपानाचा आरोग्यावर होणारा परिणाम

तंबाखूमुळे जगभरात सुमारे आठ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. हे श्वसन रोग जसे की, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) होण्यास कारणीभूत ठरते. त्याशिवाय याचा प्रजननक्षमतेवरही परिणाम होतो आणि गर्भवती महिलांमध्ये, यामुळे अकाली प्रसूती, मृत बालकांचा जन्म आणि कमी वजनाच्या बाळांचा जन्म अशा समस्या होऊ शकतात. भारतात जवळजवळ २७ टक्के प्रौढ लोक तंबाखूचे सेवन करतात, ज्यापैकी काही तंबाखू चघळतात आणि काही धूम्रपान करतात.

भारतातील तंबाखू नियंत्रणावरील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात ‘तंबाखूमुक्त भविष्यातील पिढी’ तयार करण्यासाठी २०४० व्हिजन डॉक्युमेंटचा उल्लेख केला आहे, ज्यानुसार २०२२ नंतर जन्मलेल्यांना तंबाखूच्या जाहिरातींना सामोरे जावे लागणार नाही, जेथे सर्व नवीन तंबाखू उत्पादनांवर बंदी घातली जाईल आणि साध्या पॅकेजिंगकडे वाटचाल केली जाईल.