Eye Care Tips in Marathi : मानवी शरीराचा सर्वांत नाजूक अवयव म्हणजे डोळे. डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. डोळे हा असा अवयव आहे की, ज्यामुळे आपल्याला हे सुंदर जग पाहता येते.
डोळे खूप नाजूक असल्यामुळे डोळ्यांची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेक जण डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी डोळ्यांमध्ये दररोज आवडीने काजळ घालतात. पण, या काजळाचे महत्त्व, त्याचे डोळ्यांना होणारे फायदे आणि तोटे याविषयी पुण्यातील नामवंत नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश पवार सांगतात, ” डोळ्यामध्ये काजळ घालण्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहे. डोळे दृष्टी आणि दिसण्यासाठी, तसेच चांगले राहण्यासाठीही काजळाचा वापर केला जायचा. मध्यंतरी काजळ हे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आले. घरी बनवले जाणारे काजळ असायचे; त्यात तूप असायचं आणि स्वच्छ हाताने ते घातले जायचे. पण, जेव्हा बाजारात काजळ विक्रीला आले, तेव्हा ते कोणत्या रसायनापासून बनवले जाते याची कल्पना नसायची. त्यामुळे याचे वेगवेगळे दुष्परिणाम दिसून आले.”
पुढे डॉ. पवार सांगतात, “सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणजे काजळ घातल्यानंतर डोळे लाल होणे, काळ्या बुबुळांना सूज येणे, असे प्रकार दिसून येतात. जर त्या काजळाची रसायन प्रक्रिया व्यवस्थित नसेल, काजळ जर जाड असेल, तर डोळ्यांतील अश्रू वाहून नेणाऱ्या नलिकेमध्ये काजळाचे हे बारीक बारीक कण जाऊन बसतात आणि त्यामुळे ती नलिका ब्लॉक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये सतत पाणी येणं, लासूरसारखा आजार होणं, असे त्रास दिसून येतात.”
काजळ हे डोळ्यांचे औषध आहे का?
डॉ. पवार म्हणतात, “काजळ हे डोळ्यांचं औषध म्हणता येऊ शकतं. डोळ्यांच्या वरच्या बाह्य आवरणामध्ये ज्या पेशी असतात, त्या पेशींमध्ये झालेला मलसंचय या काजळामुळे बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे डोळे स्वच्छ राहतात आणि तेजस्वी दिसतात.”
काजळामध्ये कोणते घटक असतात?
डॉ. पवार सांगतात, “काजळामध्ये फक्त कार्बन असतो. कार्बन कशापासून बनवलेला आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. जर काजळ साध्या रॉकेलपासून बनवलं असेल, तर त्यातून येणारा वास किंवा त्यातील रसायनामुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते; पण जर काजळ गाईच्या तुपाच्या दिव्यापासून बनवलं असेल, तर ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.”
काजळ लावल्यानंतर लहान मुलांना झोप का येते?
डॉ. पवार सांगतात, “काजळ घातल्यानंतर डोळ्यांची जळजळ होते आणि नंतर गार वाटतं. त्यामुळे डोळे आपोआप मिटले जाऊन मुलं लवकर झोपतात.”
हेही वाचा : अतिरिक्त कर्बोदकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढतं का? डाॅक्टर काय सांगतात…
काजळ लावण्याचे फायदे
“काजळाच्या प्रकारामध्ये सुरमा हा एक प्रकार आहे. सुरमामध्ये वेगवेगळ्या औषधी आणि वनस्पती वापरल्या जातात. पूर्वी आयुर्वेद पद्धतीनं नेत्रोपचार व्हायचे. त्यावेळी अंजन म्हणून त्याचा वापर केला जायचा. त्यामुळे काजळ हे एक प्रकारे अंजनच आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. औषधी वनस्पती आणि काटेकोरपणे काजळ तयार केले असेल, तर त्याचा फायदा दिसून येईल.” असे डॉ. पवार सांगतात.
काजळ नियमित लावायचे का? काजळाचे तोटे आहेत का?
डॉ. पवार सांगतात, “काजळ योग्य पद्धतीने तयार केले असेल, तर तुम्ही ते नियमित डोळ्यांमध्ये घालू शकता. हातांची स्वच्छता न करता जर तुम्ही काजळ घालत असाल, तर फायद्यांपेक्षा त्याचे तोटेच जास्त दिसून येतील. डोळ्याला जखम होणे, डोळ्यांत जळजळ निर्माण होणे आणि या जखमेमध्ये इन्फेक्शन होणे, हे अतिशय धोकादायक, नजरेवर अपाय करणारे आणि अंधत्वाकडे नेणारे परिणाम असू शकतात.
“काजळ घातल्यानंतर सुरुवातीला पाणी येऊ शकतं. पण काजळाच्या दुष्परिणामांविषयी विचार केला, तर सतत पाणी येणं, डोळ्याला लाली येणं, डोळ्यात चिकटपणा जाणवणं आणि प्रकाशाकडे पाहू न शकणं, डोळ्यात सुई टोचल्याप्रमाणे वेदना होणं इत्यादी लक्षणं दिसू शकतात. कदाचित काजळामुळे असे दुष्परिणाम होऊ शकतात.
जर डोळ्यांचा एखादा आजार असेल किंवा नुकतंच डोळ्याचं ऑपरेशन झालं असेल किंवा डोळ्यात इन्फेक्शन असेल, तर अशा वेळी काजळ घालणं टाळावं.”