World Sleep day 2023: दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो. वर्ल्ड स्लीप सोसायटी या संघटनेद्वारे वर्ल्ड स्लीप डेची संकल्पना मांडण्यात आली होती. या निमित्ताने जगभरात मानवी जीवनामध्ये विश्रांती, झोप यांचे महत्त्व लोकांना पटवून दिले जाते. काही ठिकाणी याबाबत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते. निद्राचक्र (Sleep cycle) सुरळीतपणे चालू राहिल्यास मानसिक आणि शारीरिक वाढ होण्यास मदत होते.
अनेक ठिकाणी सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्त झाल्यावर लगेच जेवण करण्याची परंपरा पाहायला मिळते. आहारशास्त्रानुसार, संध्याकाळ झाल्यानंतर पदार्थांचे सेवन कमी प्रमाणामध्ये करणे योग्य मानले जाते. मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांच्या जेवणाच्या सवयींमध्येही बदल झाले आहेत. लोक सकाळी उपाशी राहून रात्री प्रमाणापेक्षा जास्त जेवण करु लागले आहेत. यामुळे वजन वाढणे, झोप न लागणे या समस्यांचे प्रमाणही वाढत आहे. खाल्लेला पदार्थ व्यवस्थितपणे पचायला किमान काही तास लागू शकतात. त्यात काही पदार्थांचे सेवन रात्री केल्याने पचनक्रिया मंदावते. अशा वेळेस पोटदुखी, जळजळ आणि निद्रानाश अशा गोष्टी संभवतात. आहारतज्ज्ञ सलोनी झवेरी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीमध्ये रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खाणे टाळावेत याविषयीची माहिती दिली आहे.
कॅफिनयुक्त पदार्थ (Caffeine)
कॉफी, सोडा, चहा यांसारख्या पदार्थांमध्ये कॅफिन हा पदार्थ आढळतो. कॅफिन हे एक उत्तेजक आहे. याच्या सेवनामुळे शरीरामध्ये तरतरी येते आणि झोप नाहीशी होते. कॅफिन पचायलाही बरेच तास जावे लागतात. रात्री झोपण्याआधी कॅफिनयुक्त पदार्थ शरीरामध्ये गेल्याने लवकर झोप येणार नाही.
अल्कोहोल (Alcohol)
अल्कोहोलमुळे मनुष्याला तंद्री लागत असते. बऱ्याचजणांना रात्री मद्यपान करायची सवय असते. याच्या सेवनामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो किंवा रात्री-अपरात्री जाग येऊ शकते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी मद्यपान करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
मसालेदार पदार्थ (Spicy and Fatty Foods)
चमचमीत मसालेदार पदार्थ चविष्ट असले तरी त्यांची पचनाची प्रक्रिया फार संथगतीने पूर्ण होत असते. रात्री झोपण्यापूर्वी असे पदार्थ खाल्याने छातीमध्ये आणि पोटामध्ये जळजळ होऊ शकते. काही वेळेस याने शरीरातील अॅसिड्सचे प्रमाण वाढू शकते. अशा स्थितीमध्ये झोपताना त्रास होऊ शकतो.
साखरयुक्त पदार्थ (Sugary Foods)
शरीरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने अनेक समस्या उद्भवतात. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास निद्रानाशाचा धोका संभवतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी अतिप्रमाणात साखर असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
आणखी वाचा – वजन कमी करण्यासाठी भात योग्य की चपाती? जाणून घ्या कसा असावा आहार
हाय-प्रोटीन असलेले पदार्थ (High-protein Foods)
मानवी शरीरासाठी प्रथिने फार आवश्यक असतात. यांच्या मदतीने शरीराची वाढ होत असते. परंतु अति प्रमाणात हाय-प्रोटीन असलेल्या पदार्थांच्य़ा सेवनामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. हे पदार्थ पचायला कठीण असल्याने शरीरामध्ये पचनक्रियेचा वेग मंदावते. हाय-प्रोटीन पदार्थ खाल्याने अस्वस्थ वाटू शकतो. परिणामी झोपमध्ये व्यत्यय आल्याने निद्राचक्र बिघडू शकते. यामुळे रात्री चरबीयुक्त आणि उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ खाऊ नये.