दमा किंवा अस्थमा हा एक श्वसनाचा आजार आहे. दमा या आजाराचे रुग्ण पाहिले नाहीत, असे सहसा होत नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरील व्यक्तीला याचा त्रास होताना दिसून येतो. आपल्या आजूबाजूला असलेली प्रचंड धूळ, माती व प्रदूषण या सर्वांमुळे श्वसनाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेक व्यक्तींचे आजार बळावत असून, त्यांना दमा झाल्याचे निदान होत आहे. दमा हा श्वसनमार्ग आणि फुप्फुसांशी संबंधित एक गंभीर आजार आहे. त्यामध्ये अनेक वेळा रुग्णाला योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो. हा आजार लहानांपासून मोठ्यांपर्यंत कधीही होऊ शकतो.
सध्या भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दम्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दमा ही एक श्वसन स्थिती आहे; जी तुमच्या फुप्फुसांवर परिणाम करते. या प्रकरणात ब्रोन्कियल नलिका सूजतात; ज्यामुळे स्नायूंमध्ये हवा जाणे कठीण होते आणि श्वास घेण्यात अडचण वाढते. अशा स्थितीत श्वास घेताना घरघरण्याचा आवाज येतो. त्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास अस्थमा हा जीवघेणा ठरू शकतो. परंतु, दमा अतिशय गंभीर स्वरूपाचा हा आजार असला तरी काळजी घेतल्यावर आणि योग्य उपचार केल्यावर तो बरा होऊ शकतो. पण, जिवंत मासे गिळल्याने दमा बरा होऊ शकतो का? याच विषयावर बेंगळुरू येथील एमडी रेस्पिरेटरी मेडिसिन आणि ‘बर्ड्स क्लिनिक’चे वरिष्ठ सल्लागार डॉ. शिवकुमार के. यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हैदराबादच्या ‘फिश प्रसादम’ (Fish Prasadam) अर्थात दम्यावरील घरगुती तयार केलेल्या औषधाच्या वाटपाला ८ जूनपासून सुरुवात होणार आहे. जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले औषध लावण्यात येते आणि तो मासा रुग्णाच्या घशात सोडण्यात येतो. हे औषध दमाग्रस्तांना देण्यात येते.
(हे ही वाचा : तोंडातील दुर्गंधीपासूनच्या सुटकेसाठी तुम्हीही रोज माउथवॉश वापरताय? पण डाॅक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? )
बथिनी हरिनाथ गौड (जे गेल्या वर्षी निधन झाले) यांच्या अध्यक्षतेखालील गौड कुटुंबाने ही प्राचीन प्रथा सुरू केली. ही प्रथा दमा आणि श्वसनाच्या इतर आजारांपासून आराम मिळत असल्याचा दावा करते. ‘मत्स्यप्रसाद’ वाटण्याची ही परंपरा १७८ वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी ‘मृगसिरा कार्थी’च्या दिवशी ‘फिश प्रसादम’चे वाटप केले जाते. गौड कुटुंबाने पूर्वी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले होते की, श्वासोच्छवासाच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या घशात हर्बल पेस्ट टाकून जिवंत स्नेकहेड मुरल फिश दिल्याने कायमचा आराम मिळतो, असा दावा गौड कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
त्यावर डॉ. शिवकुमार के. सांगतात, “आज आपण पुराव्यावर आधारित औषधांच्या युगात आहोत. योग्य पुराव्याशिवाय अशा पद्धतींची शिफारस करणे किंवा लिहून देणे योग्य नाही. कोणत्याही दावा केलेल्या उपचारांची शिफारस करण्यापूर्वी, तसेच त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता स्थापित करण्यासाठी व्यापक प्रयोगशाळा अभ्यास आणि क्लिनिकल चाचण्या केल्या पाहिजेत.”
डॉ. शिवकुमार यांच्या मते, अस्थमाच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी ‘फिश प्रसादम’च्या परिणामकारकतेचे समर्थन करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे किंवा क्लिनिकल संशोधन उपलब्ध नाही. “दमा ही श्वसनमार्गाची जळजळ आणि अरुंद होणे याद्वारे वैशिष्ट्यीकृत एक तीव्र श्वसन स्थिती आहे आणि त्याच्या उपचारांमध्ये सामान्यतः इनहेलर, कॉर्टिकोस्टिरॉईड्स व इतर औषधे समाविष्ट असतात; जी सूज कमी करतात आणि वायुमार्ग उघडतात.”
‘फिश प्रसादम’चे धोके
अॅलर्जीक प्रतिक्रिया : काही दम्याच्या रुग्णांना सीफूडची अॅलर्जी असू शकते; ज्यामुळे गंभीर अॅलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकतात आणि दम्याची लक्षणे वाढू शकतात.
संसर्गाचा धोका : माशांचा प्रसाद देण्याची पद्धत; ज्यामध्ये जिवंत मासा गिळला जातो. त्यामुळे स्वच्छतेबाबतची चिंता निर्माण होते. हातमोजे आणि इतर स्वच्छताविषयक उपाय न वापरण्याच्या सरावामुळे संसर्गाचा धोका होऊ शकतो.
गॅस्ट्रोइंटेस्टायनल धोके : जिवंत मासे गिळल्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टला संभाव्य हानी होऊ शकते. त्यामुळे गुदमरणे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल त्रास यांसारख्या गुंतागुंतीचा त्रास होऊ शकतात.
शेवटी “दम्याच्या रुग्णांना पुराव्यावर आधारित वैद्यकीय उपचारांचे पालन करण्याचा, तसेच कोणत्याही पर्यायी उपायांचा विचार करण्यापूर्वी त्यांच्या आरोग्य सेवा प्रदात्यांशी सल्लामसलत करण्याचा सल्ला देतो,” असे डॉ. शिवकुमार ठामपणे सांगतात.