Excessive Yawning Health Issues: जांभई येणे ही बाब बहुतेकदा झोप किंवा कंटाळलेपणाशी संबंधित असते आणि ती तुमच्या मेंदूला तुमचे शरीर जागृत ठेवण्याच्या दृष्टीने मदत करते. पण, जर तुम्ही रात्रंदिवस, वारंवार जांभया देत असाल, तर ते अनेक आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.
तज्ज्ञांच्या मते, जास्त जांभया येणे हे हृदयरोग किंवा मानसिक आरोग्य समस्यांसारख्या अनेक आरोग्य समस्या दर्शवू शकते. पण, हे चिंतेचे कारण कधी बनते?
“जांभई देण्याची ‘खूप जास्त’ अशी अचूक गणना प्रत्येक व्यक्ती-व्यक्तीपरत्वे बदलू शकते,” असे सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल, मुंबई येथील इंटर्नल मेडिसिन सल्लागार डॉ. दिव्या गोपाल म्हणाल्या.
परंतु, मूलतः जर जांभई वारंवार व सातत्याने येत असेल आणि थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे यांसारख्या इतर लक्षणांसह जांभई असेल, तर तुम्ही जरूर हेल्थकेअर प्रोफेशनल्सचा सल्ला घ्यावा. हे बहुतेकदा अचानक आणि कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय होऊ शकते.
जास्त जांभया येण्यामागे कोणत्या प्रकारच्या कमतरता व शारीरिक समस्या कारणीभूत?
डॉ. गोपाल यांच्या मते, जास्त जांभई येण्यामागचे संकेत खालीलप्रमाणे :
झोपेचा अभाव : चांगली झोप न मिळाल्याने जांभया येण्याचे प्रमाण वाढू शकते.
कंटाळा किंवा थकवा : मानसिक थकव्यामुळे वारंवार जांभया येऊ शकतात.
हृदय समस्या : जास्त जांभई येणे ही बाब मेंदूपासून हृदय आणि पोटापर्यंत जाणाऱ्या व्हॅगस मज्जातंतूशी (Vagus nerve) देखील जोडली जाऊ शकते.
मज्जातंतूविषयक समस्या : वाढत्या जांभयांचा संबंध अपस्मार (epilepsy) सारख्या मज्जातंतूविषयक समस्यांशीही निगडित असू शकतो.
मेंदूच्या समस्या : जास्त जांभया येणे ही सामान्य बाब नसली तरी काही लोकांमध्ये ती ब्रेन ट्यूमर असण्याचेही निदर्शक असू शकते.
याचा लोहाची कमतरता व ऑक्सिजनचे कमी प्रमाण असण्याशी कितपत संबंध?
“रक्तातील ऑक्सिजन वाहतुकीसाठी लोह आवश्यक आहे. जेव्हा लोहाची पातळी कमी असते, तेव्हा शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे भरपाई देणारी यंत्रणा म्हणून जांभई येण्याचे प्रमाण वाढू शकते. शरीर ऑक्सिजनचे सेवन वाढवणे आणि सतर्कता सुधारणे यांसाठीही शरीराकडून जांभई दिली जाते,” असे डॉ. गोपाल म्हणाल्या.
स्लीप अॅप्निया किंवा फुप्फुसांच्या दीर्घकालीन आजारांसारख्या परिस्थितींमुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते आणि वारंवार जांभया येऊ शकतात.
परिस्थिती सुधारण्यासाठी काही संभाव्य घरगुती उपाय :
आरामदायी झोपेचे प्रयत्न : नियमित झोपेचा पॅटर्न आणि आरामदायी झोपेचे वातावरण सुनिश्चित करा.
लोहाचे सेवन वाढवा: तुमच्या आहारात पालकासारख्या भाज्या आणि सफरचंद, बेरी यांसारख्या फळांचा समावेश करून लोहाचे सेवन वाढेल असे पाहा.
हायडेट्रेड राहा: डिहायड्रेशन आणि लोहाच्या कमतरतेची लक्षणे खूप समान असल्याने हायडेट्रेड राहण्याचा प्रयत्न करा.
नियमित व्यायाम: शारीरिक हालचाल आणि नियमित व्यायामामुळे ही ऑक्सिजनची पातळी आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते.
घरगुती उपचारांमुळे सौम्य प्रकरणे कमी होण्यास मदत मिळू शकते; परंतु सतत जास्त जांभया येत असतील, तर हेल्थकेअर प्रोफेशनल्सचा सल्ला घेणे आवश्यक आहे.