‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम अभिनेता मोहसिन खानने अलीकडेच खुलासा केला की, त्याला २०२३ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याला फॅटी लिव्हरचेदेखील निदान झाले होते. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ३२ वर्षीय मोहसीनने सांगितले की, मला फॅटी लिव्हरचे निदान झाले आणि गेल्या वर्षी मला हृदयविकाराचा सौम्य झटकाही आला होता. मी लोकांना सांगितलं नाही. सात वर्षं सातत्यानं काम केल्याचा माझ्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला आणि त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. खूप जास्त त्रास होत होता. दोन-तीन रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागले आणि पूर्ण उपचार घेतल्यानंतरच मी पूर्ण बरा झालो. आता सर्व काही नियंत्रणात आहे. माशाल्लाह! मोहसीन म्हणाला की, “मला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज किंवा NAFLD चे निदान झालं आहे. कदाचित, माझं व्यग्र वेळापत्रक आणि झोपण्याच्या पद्धतीमध्ये व्यत्यय येणं ही त्याची कारणं असू शकतात. “माझी रोगप्रतिकार शक्ती खूपच कमकुवत झाली होती. मी खूप आजारी पडायचो.” पण हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा काय आहे संबध हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या.
हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा काय आहे संबध
मोहसीन खानने केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांच्यात काही संबंध आहे का हे तज्ज्ञांकडून जाणून घेतले. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना ‘रंग दे नीला’ उपक्रमाचे सह-संस्थापक व झांड्रा हेल्थकेअरचे डायबेटॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव कोविल यांनी स्पष्ट केले, “आपलं यकृत पचन, चयापचय, हार्मोन्सचं संतुलन, आवश्यक पोषक घटक साठवणे आणि प्रथिने व एन्झाइम्स तयार करणं यांसारख्या महत्त्वपूर्ण कार्यांसाठी जबाबदार आहे. फॅटी लिव्हर (स्टीटोसिस) तेव्हा होते जेव्हा यकृताच्या पेशींभोवती फॅट्स जमा होऊ लागते आणि फॅट्सचे उर्जेत रूपांतर करण्याची प्रक्रिया मंदावते. “मधुमेह, लठ्ठपणा, खराब कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी, कुपोषण, खूप मद्यपान, जलद वजन कमी करणं आणि काही विशिष्ट औषधं घेतल्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो. कालांतराने यकृताभोवती जास्त प्रमाणात फॅट्स जमा झाल्यामुळे दाहकता किंवा सूज निर्माण होऊ शकते. ही दाहकता आणि सूज वाढल्यास मूत्रपिंडाशी संबंधित विकाराची आरोग्य समस्या, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक, टाईप-२ मधुमेह व यकृताचा कर्करोग आदी होण्याचा धोका वाढतो.”
हेही वाचा – उकडलेल्या बटाट्यांपेक्षा थंड केलेले बटाटे खाणे आरोग्यदायी आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा
हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचे कारण
डॉ. कोविल यांच्या मते, ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे, त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. कारण- दोन्ही आरोग्य समस्यांचे धोका वाढविणारे घटक सारखेच आहेत. जसे की, जास्त साखर, सॅच्युरेडेट फॅट्स व व्यायाम न करणे.
डॉ. कोविल यांच्या मताशी सहमती दर्शविताना मुंबईतील परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलच्या यकृत आणि प्रत्यारोपण ICU विभागाचे वरिष्ठ सल्लागार हेपॅटोलॉजिस्ट व क्लिनिकल लीड डॉ. उदय सांगलोडकर म्हणाले, “यकृताजवळ साचलेल्या अधिक प्रमाणातील फॅट्समुळे बहुतांश वेळा संपूर्ण शरीरावर चट्टे उठतात. विशेषत: रक्तवाहिन्यांमध्ये दाहकता निर्माण होते तेव्हा यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे शरीरावर चट्टे उठू शकतात. या स्थितीला सिरोसिस म्हणून ओळखले जाते. हृदयविकाराचा धोका त्यावेळी वाढतो, ज्यावेळी रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदयातील रक्तप्रवाहात अडथळा आणतात आणि त्यामुळे काही वेळा रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. मग स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका यांसारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.”
NAFLD असलेल्या प्रौढांमध्ये हृदय बंद पडण्याची शक्यता ३.५ पट जास्त
२०२२ च्या अभ्यासात असेही नमूद केले आहे की, NAFLD असलेल्या प्रौढांमध्ये हृदय बंद पडण्याची शक्यता ३.५ पट जास्त असते. पुढे त्यात म्हटले आहे की, वृद्ध पुरुष किंवा मधुमेह किंवा कॉरोनरी हृदयरोग असलेल्या लोकांमध्ये NAFLD सर्वांत सामान्य बाब आहे.
NAFLD टाळण्यासाठी या संकेतांकडे द्या लक्ष
जास्त थकवा, ओटीपोटात अस्वस्थता, मळमळ, भूक न लागणे, अनपेक्षित वजन कमी होणे, कावीळ आणि वारंवार पचन समस्या जाणवणे हे फॅटी लिव्हरचे संकेत ठरू शकतात. “तळलेले, प्रक्रिया केलेले आणि सोडियम, साखर व प्रिझर्व्हेटिव्ह असलेले अस्वास्थ्यकर अन्न जास्त प्रमाणात खाल्याने ही समस्या उद्भवू शकते, असे डॉ. कोविल म्हणाले.
तज्ज्ञांचा आग्रह आहे की, आरोग्यदायी आहार आणि दररोज व्यायाम, नियमित प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी केल्यास या आजारापासून दूर राहण्यास मदत मिळू शकते.