Blood Pressure and stress Control: तणाव हा जीवनाचा एक भागच आहे. चांगल्या कामगिरीसाठी थोडासा ताण चांगला आहे; परंतु सततचा ताण आरोग्यासाठी हानिकारक असतो. कारण त्याचा रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो. तणाव हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून, त्यामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. ताणतणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत असल्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.
योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी योगाचे महत्त्व सांगताना एक उदाहरण सांगितले आहे. एक महिला योगा शिकण्यासाठी जेव्हा त्यांच्याकडे आली तेव्हा ती प्रचंड तणावात होती. कामं, मुलांची काळजी आणि कर्जाच्या परतफेडीच्या दबावामुळे तिची झोप, भूक आणि एकूण आरोग्यावर परिणाम झाला होता. तिला वारंवार डोकेदुखी, नैराश्य, निद्रानाश आणि बीपीसाठी औषधे दिली जात होती. मात्र, एक महिन्याच्या योगाभ्यासानंतर ती तिचे बीपी नियंत्रित करू शकली. दोन महिन्यांत तिची ऊर्जा पातळी सुधारली आणि तिची दृष्टी समस्या पूर्णपणे नाहीशी झाली. सहा महिन्यांत नैराश्य आणि झोपेची औषधेही बंद झाली. तणाव हे तिच्या सर्व समस्यांचे मूळ असल्याचे दिसून आले. संशोधनाने असे सिद्ध केले आहे की, योगामुळे तणाव कमी होतो, मज्जासंस्थेचे संतुलन सुधारते आणि चांगले संप्रेरक तयार होतात, झोपेची पद्धत सुधारते आणि तुम्हाला ऊर्जा मिळते.
उच्च रक्तदाबाशी लढा देण्याकरता असाच एक नैसर्गिक उपाय म्हणजे योग होय. योग केवळ तांत्रिकांना शांतच करत नाही तर तणाव दूर करून वाढलेल्या रक्तदाबाला नियंत्रितदेखील करतो. याच योगाभ्यासासंदर्भात योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी तणावमुक्त होण्यासाठी काही आसन सांगितले आहेत.
पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाला ‘सीटेड फॉरवर्ड बेंड’ असेही म्हटले जाते. या योगासनाचा नियमित सराव केल्याने संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास, तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे या योगासनामुळे शरीर लवचिक होते. पश्चिमोत्तानासनाचा दररोज सराव केल्याने तुमचे सर्वांगीण आरोग्य उत्तम राखणे, तसेच पाठीचा कणा आणि त्याच्या सभोवतालच्या स्नायूंमध्ये रक्ताभिसरण योग्य प्रकारे होणे यांसाठी मदत मिळते.
पश्चिमोत्तानासनाची पद्धत
१. पश्चिमोत्तानासन करण्यासाठी तुमच्यात परिपक्वता असणे आवश्यक आहे. जर हे योगासन तुम्ही पहिल्यांदाच करीत असाल, तर योगतज्ज्ञाची अवश्य मदत घ्या.
२. पश्चिमोत्तानासनाचा सराव हा सुरुवातीला तुम्हाला थोडा कठीण वाटू शकतो. परंतु, हळूहळू याचा सराव वाढवल्यास तुम्ही यात परिपक्व होऊ शकाल.
३. या योगासनाच्या सरावासाठी सर्वांत आधी योगा मॅटवर दोन्ही पाय पसरून जमिनीवर बसा.
४. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे शरीर हळूहळू पुढे वाकवा.
५. आता तुमच्या पायाच्या बोटांना दोन्ही हातांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
६. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही गुडघे ताठ असायला हवेत.
७. आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.
८. त्यानंतर तुम्ही पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.
उष्ट्रासन
या आसनस्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते, म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ठ, अपचन दूर होण्यास मदत होते.
उधारकर्षासन
पाठीवर झोपा. श्वास घ्या आणि आपला उजवा पाय ९० अंशांपर्यंत वर उचला. श्वास सोडत उजवा पाय शरीराच्या डाव्या बाजूला ठेवा, त्याच वेळी डोके उजवीकडे वळवा. जोपर्यंत आरामदायी वाटेल तोपर्यंत या स्थितीत राहा. नंतर उजवा पाय परत ९० अंशांपर्यंत वर करा, श्वास सोडा आणि सुरुवातीच्या स्थितीत परत या. दुसऱ्या पायाने तीच पुनरावृत्ती करा.
© IE Online Media Services (P) Ltd