Yoga for Back Paine: पाठदुखी ही अनेकांसाठी अतिशय सामान्य समस्या आहे. आजच्या जीवनशैलीमुळे, बरेच लोक पाठदुखीच्या समस्येने त्रस्त राहतात. दिवसभर बसून मागे राहून कडकपणामुळे बर्याच लोकांना त्रास होतो. आजच्या जीवनशैलीमुळे पाठदुखी अनेकांच्या पाठी लागली आहे. ऑफिसमध्ये सतत एकाच ठरावीक पद्धतीने वा मागे रेलून तासन् तास सलगपणे काम करीत राहिल्याने स्नायूंमध्ये कडकपणा येतो आणि मग परिणामत: हळूहळू पाठदुखी मागे लागते.
कित्येकांना थोडेसे वाकले तरी पाठीला खूप वेदना होतात. परंतु, पाठदुखी ही सामान्य समस्या समजून, अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. दीर्घकाळपर्यंत चालणारी पाठदुखीची समस्या तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी योगज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी एक उपयुक्त आसन सांगितल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
योगासनांमुळे शरीर लवचिक बनते आणि वेदनांपासून आराम मिळतो. जर पाठदुखीची समस्या तुम्हाला त्रास देत असेल, तर मकरासन केल्याने आराम मिळेल. या योगासनाविषयी जाणून घेऊया…
मकरासन
हे आसन सर्व प्रकारच्या पाठीच्या समस्येने त्रस्त असलेल्यांसाठी चांगले आहे. तुमच्या पाठीचा कणा आणि मज्जातंतूंमधील तणाव दूर करण्यासाठी तुम्ही या आसनाच्या सुरुवातीच्या स्थितीत दीर्घकाळ राहू शकता. हे आसन नियमितपणे केल्याने खांदे आणि पाठीच्या कण्यातील ताठरपणा, तणाव कमी होतो आणि तेथील स्नायू मजबूत व लवचिक बनतात. म्हणूनच स्नायूंशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी मकरासन नित्य नेमाने करणे आवश्यक ठरते. नितंबांचे स्नायू बळकट करण्यासाठीही या आसनाचा चांगला उपयोग होतो.
या आसनात डोळे बंद करून श्वास घ्यायचा असतो. असे केल्यामुळेच शरीर आणि मेंदू अगदी शांत होत जातो. स्त्रियांना होणाऱ्या कंबरदुखीच्या त्रासातही या आसनाचा चांगला उपयोग होतो. मकरासन करताना आपण पोटावर झोपतो तेंव्हा फुफ्फुसाच्या मागच्या भागापर्यंत हवा भरल्या जाते व फुफ्फुसांना भरपूर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो.
(हे ही वाचा : बाजारात मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल? तज्ज्ञांचा सल्ला वाचा )
मकरासन कसे करावे?
१. मकरासन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर आडवे व्हावे.
२. दोन्ही पायात कमीत कमी दिड फूट एवढे अंतर ठेवा.
३. पायांची बोटे जमिनीला टेकतील व पायांचे तळवे वर आकाशाकडे राहतील असे झोपा.
४. डोके आणि खांदे वर उचलून घ्यावेत आणि तळहातांवर हनुवटी टेकवून कोपरे जमिनीवर ठेवावीत.
५. पाठीच्या कण्याला अधिक वळण मिळावे यासाठी दोन्ही कोपरे एकाच समान अंतरावर राहतील याकडे लक्ष द्यावे.
५. मानेवर जास्त ताण पडत असल्यास कोपरे थोडी दूर करावीत. कोपरे फार पुढे असतील, तर मानेवर जास्त ताण येईल आणि शरीराच्या अगदी जवळ असतील, तर पाठीवर ताण येईल.
६. आपल्या शरीराचा अंदाज घेऊन कोपरे योग्य जागी टेकवावीत. उत्तम जागा तीच; जिथे कोपरे टेकवल्यानंतर पाठ, मान व खांद्यांना छान आराम मिळेल.
७. डोळे बंद करून खोल श्वास घ्या व बाहेर सोडा थोडक्यात सांगायचं झालं तर दीर्घश्वसन करा.
याव्यतिरिक्त, साखर, फास्ट फूड्स, फॅटी, तळलेले अन्न, खूप कॉफी किंवा चहा टाळा. शेंगदाणे कमी प्रमाणात घ्या. झोपण्यापूर्वीच्या आवश्यक कृतींमध्ये शवासन आणि योग निद्रा यांसारख्या विश्रांती पद्धतींचा समावेश करा. मकरासन केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. या आसनाच्या नियमित सरावाने उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग, टाईप २ मधुमेह व दमा यांपासून आराम मिळू शकतो.