Auto-Bewery Syndrome: अनेकांच्या सकाळच्या नाश्त्याची सुरुवात ब्रेड-बटर, ब्रेड-जाम, ब्रेड चहा/कॉफी आणि ब्रेड सँण्डविच खाल्ल्याने होते. परंतु ब्रेड कमीत कमी कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण- ब्रेड तुमच्या शरीरासाठी सर्वांत धोकादायक गोष्ट असू शकते. डॉ. मिकी मेहता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिल्यानुसार, दररोज ब्रेड खाल्ल्याने ऑटो-ब्रूअरी सिंड्रोम होऊ शकतो, ही एक दुर्मीळ स्थिती आहे, जी आतड्यातील मायक्रोबायोमला ब्रेडमध्ये आढळणाऱ्या कार्बोहायड्रेट्सपासून इथेनॉल जास्त प्रमाणात तयार करण्यास अनुमती देते, ज्यामुळे अल्कोहोलयुक्त पेय न घेताही नशेची लक्षणे दिसू शकतात.

परंतु, दररोज ब्रेड खाल्ल्याने तुमचे आरोग्य खरेच धोकादायक आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही एका आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

बेंगळुरू येथील एस्टर व्हाइटफील्ड हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. बसवराज एस. कुंभार म्हणाले की, एबीएस किंवा ऑटो ब्रुअरी सिंड्रोम ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये आतड्यांमधील सूक्ष्मजीवांद्वारे कार्बोहायड्रेट्सच्या किण्वनामुळे शरीरात अल्कोहोल तयार होते, ज्यामुळे नशेची लक्षणे दिसतात. याला आतड्यांचे किण्वन सिंड्रोम, असेही म्हणतात आणि ही एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे.

ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम (ABS) सहसा कमकुवत आतड्यांचे आरोग्य, अंतर्निहित आजार किंवा कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतो.

या लक्षणांकडे लक्ष ठेवा

डॉ. कुंभार यांनी चक्कर येणे, तंद्री, गोंधळ, मूड स्विंग किंवा आक्रमकता यांसारख्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. काही प्रकरणांमध्ये रुग्णांना अतिसार व मळमळ होण्यासह पोट फुगणे आणि पोटदुखीही होऊ शकते. अशा वेळी तुम्ही वैद्यकीय तपासणी करू शकता.

दररोज ब्रेड खाल्ल्याने तुम्हाला ABS होऊ शकतो का?

“दररोज ब्रेड खाल्ल्याने हा सिंड्रोम थेट होत नाही. एबीएस सामान्यतः अँटीबायोटिकचा अतिवापर, आतड्यांतील डिस्बिओसिस किंवा यीस्टच्या अतिवृद्धीला परवानगी देणाऱ्या रोगप्रतिकार शक्ती कमी करण्यासारख्या घटकांशी जोडलेला असतो. ब्रेडमध्ये यीस्ट आणि कार्बोहायड्रेट्स असतात. परंतु, तुमचे आरोग्य पूर्णपणे चांगले असल्यास ब्रेड दररोज खाल्ल्याने एबीएस होत नाही, ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे अशा लोकांना हा आजार होण्याची दाट शक्यता असते.

सामान्य लोकांनी एबीएस टाळण्यासाठी ब्रेडचे सेवन मर्यादित करण्याची आवश्यकता नाही. नियमित आहाराचा भाग म्हणून ब्रेडचे सेवन कमी प्रमाणात करणे पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी शिफारस डॉ. कुंभार यांनी केली.

त्यांच्या मते, कार्बोहायड्रेट आणि साखर नियंत्रणावर लक्ष केंद्रित करून, या आजारावर उपचार करण्यास मदत मिळवू शकतो. त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. “जर बुरशीजन्य संसर्ग आढळला, तर रुग्णाला अँटीफंगल उपचार, प्रोबायोटिक्सयुक्त आहार आणि संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (CBT) सत्रांवर ठेवले जाते,” असे ते पुढे म्हणाले.