Hallucinations : काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका मानसोपचार तज्ज्ञांची एक पोस्ट चर्चेत आली होती. त्यांनी एक्स (X) या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्यांच्याकडे आलेल्या एका रुग्णाविषयी सांगितले होते. पोस्टमध्ये ते सांगतात की, त्यांच्याकडे आलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला सिनेअभिनेत्यांचा भास होतो; विशेषत: करीना कपूर दिसते. एवढेच काय तर जेव्हा हा तरुण या मानसोपचार तज्ज्ञांकडे आला तेव्हा करीना कपूर त्याच्यासमोर बसलेली त्याला दिसत होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा नेमका काय प्रकार आहे? एखाद्या व्यक्तीचा भास होणे म्हणजे खरेच ती व्यक्ती दिसते का? याचा संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी आहे का? याविषयी लोकसत्ताने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भास होणे म्हणजे नेमका काय प्रकार आहे?

डॉ. रश्मी जोशी : एखादी व्यक्ती तुमच्या डोळ्यांसमोर हातवारे करते, इशारे करते, तुमच्याशी बोलते किंवा ती इतर कुणाशी तरी बोलतेय. पण, प्रत्यक्षात फक्त तुम्हालाच ती व्यक्ती दिसते; इतर कोणालाही ती दिसत नाही. याच गोष्टीला आपण ‘भास’ म्हणतो.

भास वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात का?

डॉ. रश्मी जोशी : भास हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आवाज ऐकू येणे, एखादी व्यक्ती किंवा वस्तू दिसणे, स्पर्श जाणवणे, वास येणे इत्यादी. हे जे भास होतात, त्याला स्किझोफ्रेनिया (schizophrenia) म्हणतात.

आवाज ऐकू येणे – या प्रकारामध्ये तुमच्या कानामध्ये सतत आवाज ऐकू येतो. तुमचा स्वत:चा आवाज स्वत:ला ऐकू येतोय किंवा दुसरी व्यक्ती तुमच्याशी बोलते. काही भास कधी कधी सूचना देणारे असतात. “तू स्वत:ला मारून टाक, तू काही कामाचा नाही”, असेसुद्धा आवाज कानामध्ये ऐकू येऊ शकतात. अशा वेळी रुग्णाकडून चुकीचे पाऊल उचलले जाऊ शकते. आपल्याला पाच इंद्रिये आहेत. कोणत्याही इंद्रियाला धरून आपल्याला भास होऊ शकतात.

कॉमेंट्री – दोन व्यक्तींचे एकमेकांशी बोलणे ऐकू येणे यालाच कॉमेंट्री भास म्हणतात. त्याशिवाय या प्रकारामध्ये दंगलीचे आवाज ऐकू येणे, असे भाससुद्धा होऊ शकतात.

एखादी व्यक्ती दिसणे – या प्रकारामध्ये तुम्ही एखाद्याला खरोखर बघू शकता. तुम्हाला एखादी व्यक्ती दिसू शकते किंवा देव दिसू शकतो आणि त्याचे वर्णन तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करता. उदा. त्या व्यक्तीची साडी कशी आहे, तिने मोठा टिळा लावला आहे. तिचे केस मोकळे आहेत, ती काळ्या कपड्यांमध्ये आहे, ती भूत आहे. तुम्हाला व्यक्ती दिसू शकतात आणि त्या तुमच्याशी बोलतायत, असा तुम्हाला भास होतो.

त्वचेवर हालचाली – जेव्हा त्वचेवर काहीतरी चालत आहे किंवा हालचाल होत आहे, असे वाटते; त्याला ‘टॅक्टाइल’ भास, असे म्हणतात. अशा प्रकारचा भास जास्तीत जास्त कोकेनचे सेवन करणाऱ्यांना व्यक्तींना होत असल्याचे दिसून येते.

सारखा वास येणे – एखाद्या व्यक्तीला आजूबाजूला सर्व काही स्वच्छ असताना सारखा काही सडले असल्याचा वास येतो. तर, हासुद्धा एक भासाचा प्रकार आहे.

हेही वाचा : तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा

मृत व्यक्ती दिसणे – ‘सेन्स ऑफ प्रेझेन्स’मुळे तुम्हाला मृत व्यक्ती दिसू शकतात. भीतीपोटी, अॅन्ग्झायटी, अटॅचमेंटमुळे मृत व्यक्ती दिसू शकतात. जर एखाद्या स्त्रीचा पती वारला तरी तिला त्याचे अस्तित्व घरात जाणवत असेल, तर ही बाब त्या व्यक्तीशी असलेल्या अटॅचमेंटमुळे होऊ शकते. त्याला आजार म्हणता येणार नाही. जोपर्यंत तुमच्या दैनंदिन क्रियेवर परिणाम होत नाही, तोवर त्याला आजार म्हणता येणार नाही. तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुम्ही अभ्यास करणे बंद केले, तुम्ही नोकरी करीत असाल आणि तुम्हाला घरातच बसावेसे वाटत असेल आणि तुम्ही एकटेच बडबड करीत असाल, तेव्हा त्याला आजार म्हणता येईल. जर मृत व्यक्ती तुम्हाला तुमच्याजवळ असल्याचा भास होतो आणि तुम्ही तुमची दैनंदिन कामे करीत आहात, तर त्याला आजार म्हणता येणार नाही.

परावर्तित भास – नळ चालू केल्यानंतर असे वाटते की, कोणीतरी आपल्याशी बोलतेय, तर याला परावर्तित भास म्हणतात.

एलिमेंटरी भास – हा भास अनेकांना होतो. उदा. आपण झाडाची सावली पाहून, त्यातून चित्र तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्याशिवाय कधी कधी आपल्याला कोणी आवाज दिल्याचा भास होतो. पण, ही सामान्य गोष्ट आहे. पण प्रश्न पडतो की आजार कधी म्हणायचा?

आपल्याला आजार झाल्याचे कसे ओळखावे?

डॉ. रश्मी जोशी : जेव्हा व्यक्तीला भास सोडून बाकीची इतर लक्षणेही दिसतात. त्यांना असे वाटते की, कोणीतरी त्यांच्याविषयी बोलताहेत आणि ते त्यांच्या विरोधात आहेत, ते त्यांच्याविषयी कट रचत आहेत. कोणीतरी त्यांच्या मागे लागले आहे, त्यांच्यावर काळी जादू केली आहे इत्यादी गोष्टी जेव्हा त्या व्यक्तीला जाणवतात, तेव्हा आजार झाला, असे समजावे.

त्याशिवाय नीट झोप झाली नाही किंवा तो व्यवस्थित झोपू शकत नाही. त्यांच्या दैनंदिन क्रियांवर याचा परिणाम होतो. ते स्वत:ला विसरतात. जर त्यांना सतत आवाज येत असले, तर त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण- फक्त त्यांना आवाज ऐकू येतात. बाकीच्यांना बघणाऱ्यांना वाटतं की, हा एकटाच बडबड करतोय, त्याला काहीतरी झपाटलेलं असेल. वेडा झाला आहे, असे लोक थेट म्हणतात. खरे तर हा एक आजार आहे आणि त्यावर उपचार आहे. यामध्ये गंभीर प्रकरणेसुद्धा दिसून येतात आणि त्यावरसुद्धा उपचार आहे. फक्त वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे.

अनेकदा त्यांना इतके आवाज येतात की, खरे काय आणि खोटे काय, हे ती व्यक्ती समजू शकत नाही. हा आजार आहे, हे ती व्यक्ती मान्य करायला तयार नसते. आवाज खरा आहे आणि त्यामुळे त्यांना भास होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणजे त्यांना उपचाराची गरज आहे, असेसुद्धा त्यांना वाटत नाही. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाचे नातेवाईक त्यांना घेऊन येतात. विशेष म्हणजे सुरुवातीला त्यांना कल्पना नसते की, आपण कोणत्या गोष्टीसाठी येथे आलेलो आहोत.

हेही वाचा : ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप

भास का होतात?

डॉ. रश्मी जोशी : एक टक्का आनुवंशिक हे कारण असू शकते. जेव्हा आपण कौटुंबिक माहिती घेतो तेव्हा आपल्याला कळते की काका, मावशी, आजोबा किंवा रक्ताच्या नातेवाइंकामध्ये हा आजार किंवा अशाच प्रकारचा दुसरा आजार होता. मग कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार घरामध्ये असू शकतो. कोणामध्ये नैराश्य, तर कोणामध्ये ओसीडीचा आजार असू शकतो.

तणाव – तुमचे पालनपोषण कसे करण्यात आले, तुमचे बालपण कसे गेले, तुमच्या आई-वडिलांमध्ये वाद असेल किंवा इतर वाईट घटनेचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होऊन उदासीनता येऊ शकते. अशा वेळी भास होऊ शकतात.

व्यसन – कोणत्याही प्रकारचे व्यसन केल्यानंतर तुम्हाला भास होऊ शकतात. माझ्याकडे एक रुग्ण आला होता. त्यांना ‘लिलिपुटियन’ भास व्हायचे. लिलिपुटियन म्हणजे त्यांना छोटे छोटे हत्ती-घोडे दिसायचे. तो सांगायचा की मला हे सर्व दिसताहेत.

डोक्याला मार किंवा सेन्ट्रल नर्व्हस सिस्टीमसंबंधित आजार – सेन्ट्रल नर्व्हस सिस्टीमला जर गंभीर दुखापत झाली असेल किंवा त्यासंबंधित आजार असेल, तर तुमच्या वर्तन आणि मानसिकतेत बदल दिसून येतात. सेन्ट्रल नर्व्हस सिस्टीम ही तुमच्या टेम्पोरल लोबशी संबंधित असते. हे ऐकण्याचे तंत्र असते. जर मेंदूच्या टेम्पोरल लोबला दुखापत झाली, तर तुम्हाला भास होऊ शकतात.

तरुणाला करीना कपूरच का दिसतेय?

डॉ. रश्मी जोशी : नेता असो, अभिनेता-अभिनेत्री, गावच्या व्यक्ती, आजी-आजोबा कोणाचाही तुम्हाला भास होऊ शकतो. माझ्याकडे आलेल्या एका रुग्णाला त्याच्या गावाकडचे आवाज यायचे. कोणतीही गोष्ट तुम्हाला घेरू शकते. त्याला कारण नाही. त्यामध्ये अचानक आलेला एखादा विचारही असतो. जर मी रुग्णाला विचारले की, तुम्हाला कोणाचा आवाज येतोय, तो म्हणेल बाईचा. त्यावर मी पुन्हा त्याला विचारले कोण आहे ती बाई? त्यावर तो म्हणू शकतो की, अनोळखी बाई आहे. मी तिला ओळखत नाही. त्यामुळे करीना कपूरच का दिसतेय यामागे कारण नाही.

यावर कोणते उपचार फायदेशीर ठरू शकतात?

डॉ. रश्मी जोशी : अचानक भास होणे सुरू झाले, तर मेंदूवर उपचार घेणे गरजेचे आहे. मेंदूमध्ये ट्युमर आहे का, स्ट्रोक आला का, हे तपासणे आवश्यक आहे. कारण शोधणे, हे खूप महत्त्वाचे आहे. कारण- तेव्हाच तुम्ही उपचार घेऊ शकतात. मेडिकेशन आणि थेरेपीशिवाय पर्याय नाही. गंभीर प्रकरणामध्ये इलेक्ट्रोकन्वल्सिव थेरेपी (ईसीटी)द्वारे रुग्ण लवकर बरा होतो.

अंद्धश्रद्धेकडे वळणाऱ्या लोकांना काय सांगाल?

डॉ. रश्मी जोशी : तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थनेमुळे बळ मिळते; पण भास होतात म्हणून बाबा, बुवा अशा लोकांकडे जाऊ नये. त्यामुळे वेळ वाया जातो आणि रुग्णावर वेळेत उपचार केले जात नाहीत. अशा वेळी रुग्णांमध्ये लक्षणे वाढतात आणि त्यामुळे सुरुवातीला औषधाचा जास्त डोस त्यांना द्यावा लागतो. त्यामुळे लोकांना याविषयी मोठ्या प्रमाणात जागरूक करणे गरजेचे आहे आणि चुकीची माहिती न पसरवता, रुग्णाला डॉक्टरांकडे कसे नेता येईल आणि रुग्ण कसा बरा होईल, यावर भर देणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man sees kareena kapoor and talks with her what is hallucinations read what psychiatrist told about schizophrenia ltdc ndj