मधुमेह हा असा गंभीर आजार आहे, जो कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. केवळ भारतातच नाही तर जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार मधुमेहाला कारणीभूत घटक आहेत. आहारात जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढतेय. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर क्रियाशील ठेवत आहारावर नियंत्रण ठेवावे. काही लोक आहारात कमी गोड आणि फॅट नसलेले पदार्थ खातात, शरीर सक्रिय ठेवतात तरीही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही. अशा वेळी ते डॉक्टरांचा सल्ला घेतात, तेव्हा त्यांच्या आहारात ते शरीरास धोकादायक ठरणारे स्नॅक्स खात असल्याचे समोर येते. यात डायजेस्टिव्ह बिस्किट्स नाश्त्यासाठी खातात. याबाबत ‘मॅक्स हेल्थकेअर’चे एंडोक्रिनोलॉजी ॲण्ड डायबिटीजचे चेअरमन डॉ. अंबरीश मिथल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात कोणते पदार्थ खावेत आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कसे नियंत्रणात ठेवावे याबाबत सल्ला दिला आहे.
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापूर्वी काही जण नाश्ता करतात. या वेळी चिप्स, बिस्किट्स स्नॅक्स म्हणून सर्रास खाल्ली जातात. शहरी भागात प्रामुख्याने दिवसभरात तीन वेळा पोटभर जेवण खाल्ले जाते. यात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश असतो. याचदरम्यान काही जण दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाआधी दोन वेळा स्नॅक्स खातात. यात मधुमेहाचे रुग्ण स्नॅक्समध्ये डायजेस्टिव्ह बिस्किट्स खातात. हे बिस्किट गोड नसल्याने त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही, असा त्यांचा अंदाज असतो. पण हेच स्नॅक्स रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
याबाबत डॉ. अंबरीश मिथल म्हणाले की, स्नॅक्समुळे जेवणापूर्वी लागणारी भूक कमी करण्यास मदत होते. सकाळी किंवा सायंकाळी लागणारी भूक कंट्रोल करण्यासाठी स्नॅक्स खाल्ले जाते. यात मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी सल्ला दिला जातो की, त्यांनी दिवसभरात थोड्या- थोड्या वेळाने खावे, जेणेकरून त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढणार नाही. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी स्नॅक्स म्हणून कोणते पदार्थ खावेत जाणून घेऊ…
गरोदर महिलांनी हळदीचे दूध प्यावे की पिऊ नये? वाचा डॉक्टरांचा सल्ला
डायजेस्टिव्ह बिस्किटामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कसे वाढते?
डॉक्टरांच्या मते, डायजेस्टिव्ह बिस्किट्स कॅलरी फ्री नसतात त्यामुळे ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत. पण या बिस्किटांमध्ये इतर पदार्थांपेक्षा १५ ते २० टक्के कमी कॅलरीज असू शकतात. अनेकदा मधुमेहाचे रुग्ण या स्नॅक्समधील कमी कॅलरीज लक्षात घेत त्याचे अधिक सेवन करतात, ज्यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. कोणत्याही पदार्थाचे मर्यादित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते, पण त्याचे जास्त सेवन केल्यास शरीरास नुकसानकारक ठरते.
लो-कॅलरी स्नॅक खाल्ल्याने रक्तातील साखर कशी नियंत्रणात राहते?
१) डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जे काही खात आहात त्याच्या प्रमाणाची काळजी घ्या. मधुमेहाच्या रुग्णांना जर हेल्दी नाश्ता करायचा असेल तर त्यांनी आहारात नट्सचा समावेश करावा, हे नट्स निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स तसेच प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. या नट्समध्ये बदाम, मखणा, अक्रोड आणि पिस्ता यांचा समावेश करा.
२) भाजलेले चणे हा उत्तम नाश्ता आहे. तिळाच्या बिया, चियाचे बिया हे सर्व आरोग्यदायी स्नॅक्स आहेत. नट्स आणि बिया दोन्ही फायबरने समृद्ध असतात. या पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
३) नाश्त्यात फळ, धान्यांपासून तयार केलेली बिस्किटे आणि खारट पदार्थ तसेच साधे दही खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण पटकन नियंत्रित राहते.
आहाराची निवड करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आहार कसा आणि कोणत्या प्रमाणात घ्यायचा हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यामध्ये १५ ग्रॅमपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फायबरचे सेवन करू नये. या मूलभूत तत्त्वाचे पालन केल्याने आहार निवडणे सोपे होते.
कमी कॅलरीज असलेले पदार्थ जे तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता.
पाच अत्यंत कमी कॅलरी स्नॅक्स (५० कॅलरीपेक्षा कमी)
१ ) १ लहान सफरचंद (सुमारे ८५ ग्रॅम): ३७ कॅलरीज
२) ८० ग्रॅम ब्लूबेरी: ३२ कॅलरी
३)१ पीच (सुमारे १३८ ग्रॅम): ४६ कॅलरी
४) १ बकव्हीट डोसा (४५ कॅलरी)
· २५ ग्रॅम कॉटेज चीज (२६ कॅलरी) एकचतुर्थांश काकडी (११ कॅलरी): ३७ कॅलरी
कमी कॅलरी स्नॅक्स (५०-१०० कॅलरी)
१) ५० ग्रॅम दहीसह १०० ग्रॅम चेरी: ९० कॅलरी ( फ्रूट दही)
२) १० बदाम: ६१ कॅलरी
३) १ उकडलेले अंडे : ७९ कॅलरी
४) १ खमन ढोकला : ८० कॅलरी
५) १ कप (२५ ग्रॅम) भाजलेले मखना -९० कॅलरी
निरोगी राहण्यासाठी नाश्त्यासह व्यायाम करणे देखील तितकेच गरजेचे आहे. बर्याच वेळा आपण सकाळच्या चहाबरोबर बिस्किटे खातो. रात्री घरी पोहोचायला उशीर झाला तरी जेवणाआधी काही तरी खातो. आपल्यापैकी काही जण चिंताग्रस्त किंवा खूप तणावात असतात तेव्हा नाश्ता करतात, ही घटना सामान्यतः भावनिक किंवा आरामदायी आहार म्हणून ओळखली जाते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला खाण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा जरा थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि तुम्हाला खरोखर भूक लागली आहे का हे शोधा. अशा वेळी तुमचे मन दुसऱ्या एखाद्या कामाकडे वळवा ज्याचा अन्नाशी काहीही संबंध नाही. एखादे पुस्तक वाचा, काही संगीत ऐका किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी गप्पा मारा.
जर खरेच खूप तीव्र इच्छा होत असेल तर तुमच्या नेहमीच्या स्नॅकऐवजी हेल्दी स्नॅक खा. यावेळी चिप्स, ब्रेड, तळलेले पदार्ख खाणे टाळा, त्याऐवजी ड्रायफ्रुट्स, गाजर असे पदार्थ खा. खारट बिस्किट, टोस्टपेक्षा भाजलेले शेंगदाणे हा उत्तम पर्याय आहे. या वेळी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर मिल्क चॉकलेट, आइसक्रीम ऐवजी बेरी आणि दही खा.