How Friends Help In Physical Mental Peace: एपिडेमियोलॉजी अँड सायकियाट्रिक सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की वृद्ध व्यक्तींमधील मैत्री ही शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर घटक ठरू शकते. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक व अभ्यासाचे सह-लेखक विल्यम चोपिक, यांच्या माहितीनुसार, यापूर्वीच्या संशोधनात मैत्री आणि विशिष्ट आरोग्य फायदे यांच्यातील संबंध अधोरेखित केले गेले होते पण हा अभ्यास आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वसमावेशक आहे.
चोपिक आणि सहकाऱ्यांनी सांगितले की घट्ट मैत्री असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काही वर्षांची भर पडू शकते. आठ वर्षांच्या अभ्यासादरम्यान, सहभागींनी तीन वेळा सर्वेक्षण केले, ज्यात असे दिसून आले की ज्यांची मैत्री घट्ट होती त्यांच्या मृत्यूची शक्यता २४ टक्के कमी होती. ज्यांच्याकडे चांगले व जिव्हाळ्याचे मित्र असतात त्यांचे व्यायाम करण्याचे प्रमाण ९ टक्के जास्त असते. नैराश्याचा अनुभव येण्याचा धोका १७ टक्क्यांनी कमी तर पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता १९ टक्क्यांनी कमी होते.
डॉ पवना एस, सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ आणि नातेसंबंध तज्ज्ञ, विद्यारण्यपुरा, बंगळुरू यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, अर्थपूर्ण नातेसंबंधांमुळे तणावाचा थेट परिणाम मन व मेंदूवर होत नाही. तसेच रक्तदाब कमी होणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढणे यातही मदत होते. जवळच्या मित्रांकडून मिळणारे समर्थन मानसिक आरोग्य समस्यांचा धोका कमी करू शकते, ज्यामुळे शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
अर्थपूर्ण मैत्रीद्वारे, तुम्ही सहानुभूती, संयम आणि प्रभावी संवाद शिकता. मित्र आव्हानांच्या वेळी साथ देतात, व स्वतःची स्वतःला ओळख करून देण्यासाठी उपयोगी ठरतात. वैविध्यपूर्ण मित्रांचा गट असल्यास तुम्हाला भिन्न दृष्टिकोन समजून घेण्यास व आपल्या विचाराच्या काखा रुंदावण्यास मदत होऊ शकते. विश्वास, सहकार्य यावर आधारित मैत्री आत्मशोध घेण्यासाठी व तुम्हाला अधिक दयाळू, मुक्त मनाची व्यक्ती बनवण्यासाठी फायद्याची ठरते.
या मैत्रिला पण एक नकारात्मक बाजू आहे..
डॉ. पवना यांनी यावर भर दिला की प्रौढावस्थेतही समवयस्कांचा दबाव व्यक्तींवर लक्षणीय प्रभाव टाकू शकतो. मित्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार, निर्णय घेण्यावर आणि वागणुकीवर परिणाम होऊ शकतो. समवयस्कांकडून नाकारले जाण्याची भीती प्रौढांना वैयक्तिक मूल्यांऐवजी समूहाच्या मताशी जुळवून घेण्यास भाग पडू शकते.
वाईट मित्र तुमचा स्वाभिमान कमी करू शकतात, स्पर्धात्मक वातावरण वाढवू शकतात किंवा आव्हानात्मक काळात असह्य होऊ शकतात, डॉ पवना यांनी स्पष्ट केले की मत्सर, गप्पाटप्पा आणि विश्वासाचा अभाव यामुळे नातेसंबंधाचा पाया खराब होऊ शकतो. या नकारात्मक वर्तनांना ओळखणे आणि संबोधित करणे हे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आणि निरोगी संबंध वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.