मुक्ता चैतन्य

लहान मुलं आणि त्यांचे युट्युब चॅनल्स किंवा लहान मुलांसाठीच्या युट्युब चॅनल्सना ऑनलाईन जगात प्रचंड प्रसिद्धी आणि डिजिटल स्पेस गेल्या काही वर्षात मिळू लागली आहे. अगदी वर्ष दोन-चार वर्षांच्या मुलामुलींची चॅनेल्स इन्स्टा अकाउंट्स असतात. रील्समध्येही लहान मुलांचे व्हिडीओ अतिशय पॉप्युलर होतात. ही रील्स तसंच युट्युब व्हिडीओ मुलं स्वत: चित्रित करत नाहीत. त्यांचे आईवडील ही चॅनेल्स आणि इन्स्टा प्रोफाईल्स चालवतात. मुलांनी तयार केलेले विविध प्रकारचे युट्युब व्हिडीओ आणि रील्स पाहिल्यावर अनेकदा प्रश्न पडतो की या मुलांना हे व्हिडिओ तयार करायचे असतात का? की, आईवडिलांसाठी मुलं एक उत्तम अर्थार्जनाचं साधन होतात? या सगळ्यात त्या मुलांवर येणारा ताण, सतत काम करण्यातून येणारी अस्वस्थता, इतर मुलांसारखं जगता न येण्याचं दुःख या गोष्टींचा विचार होतो का? सोशल मीडियावर असणाऱ्या कॉण्टेन्ट क्रिएटर मुलांचा जसा तो प्रश्न आहे तसाच तो विविध रिअॅलिटी शोमधून सहभागी होणाऱ्या मुलांचाही आहेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Mental Health Special: मुलांशी हिंसेबद्दल बोलणार का?

एकीकडे आपण मुलांसाठी कुठलीही साहित्यनिर्मिती करत नाही, किंवा जी होते ती अगदीच अल्पप्रमाणातली आहे. मुलांसाठी सिनेमे, नाटक यांचं प्रमाणही आपल्याकडे अगदीच कमी आहे. म्हणजेच मोठ्यांनी, मोठ्यांसाठी तयार केलेल्या कॉण्टेन्टचे ग्राहक लहान मुले असतात किंवा मग लहान मुलांबरोबरच मोठ्यांचेही मनोरंजन कऱणारा कॉण्टेन्ट तयार होत असतो.

हे मी खूप काळजीपूर्वक लिहिते आहे. काही वर्षांपूर्वी अगदी चिमुरड्या मुलींना घेऊन एक लावणी रिअॅलिटी शो आला होता. लहान मुलींनी सगळी अदाकारी करत केलेल्या लावण्या हा मनोरंजनाचा विषय कसा काय असू शकतो? काही भागानंतरच तो कार्यक्रम बंद झाला पण अनेक छोट्या मुलींचे हिंदी सिनेमातल्या रोमँटिक आणि मादक गाण्यांवरचे अदाकारीसकटचे व्हिडीओ सहज पाहायला मिळतात. आपण जे हावभाव करतो आहोत त्याचा अर्थ तरी या मुलींना समजत असेल का? नक्कीच नाही. आईबाबा सांगतात तसं त्या गाण्यात अभिनेत्रीने केलेले हावभाव जसेच्या तसे उतरवणं एवढंच त्या करत असतात. असे व्हिडीओ अपलोड करुन त्यावर तुफान लाईक्स मिळवून त्यातून पैसे कमावताना आपण नेमकं काय करतोय हा विचार या मुलींचे पालक कधी करतात का?

आणखी वाचा: Mental Health Special: तुम्ही आहात सिच्युएशनशिपमध्ये?

करीना कुर्झवा नावाची एक लहानगी युट्युबर आहे. ‘सिस व्हर्सेस ब्रो’ हे चॅनल कधीकाळी प्रचंड हिट होतं. बहीण- भाऊ हे चॅनल चालवायचे. म्हणजे ते त्यात काम करायचे, चॅनल त्यांचे आईबाबा चालवायचे. पुढे करीना आणि तिचा भाऊ मोठे झाल्यावर हे चॅनल बंद झाले. म्हणजे नवीन व्हिडीओ करणं त्यांनी थांबवलं. करीना तिच्या एका मुलाखतीमध्ये म्हणते, “युट्युब चॅनलमुळे आमचं बालपण संपून गेलं.” सध्या पायपर रॉकेल केस अमेरिकेत गाजते आहे. पायपरची आई तिचे युट्युब चॅनल चालवायची. आणि त्यात पायपर बरोबर काम करण्यासाठी तिचे समवयीन मित्रमैत्रिणी आणि भावंडं यांचा समावेश तिने केलेला होता. ही सगळी मुलं आता मोठी झाली आहेत. चॅनेलसाठी काम करण्यासाठी रॉकेलच्या आईने कसा त्रास दिला याबाबत ते सविस्तरपणे सांगतात. हे चॅनल भारतातही प्रचंड प्रसिद्ध होते. या मुलांना चुकीच्या पद्धतीने चित्रित करुन दाखवण्यापासून त्यांचा मानसिक छळ करण्यापर्यंत अनेक गोष्टी झाल्या.

भारत असो की अन्य कुठलाही देश, मुद्दा मोठ्यांच्या जगाने मुलांचा वापर करण्याचा आहे. टॅलेंटच्या नावाखाली, संधीच्या नावाखाली, करिअरच्या नावाखाली आईवडीलच जेव्हा मुलांच्या आयुष्याचा रिअॅलिटी शो करुन टाकतात तेव्हा आपण कुठल्या आणि कशाप्रकारच्या काळात जगतो आहोत याचा विचार करण्याची गरज भासू लागते. यात अजून एक मुद्दा येतो तो मुलांच्या कन्सेंटचा म्हणजे परवानगीचा. चार आणि पाच वर्षांच्या मुलांची जेव्हा चॅनल्स आणि प्रोफाईल्स तयार केली जातात तेव्हा त्यांची परवानगी हा विषय पालकांच्या गावीही नसतो. मुलं परवानगी देण्याच्या वयात येईपर्यंत वाट पाहण्याचा संयम पालकांकडे नसतो. मुलांची परवानगी हा विषय तसाही पालकत्वाच्या चौकटीत आपण बाजूला टाकलेलाच विषय आहे. मुलांना काय कळतं इथपासूनच आपली सुरुवात होते. पण डिजिटल जगात लहान मुलांच्या नावा- चेहऱ्यासकट आपण कुठली गोष्ट करणार असू तर त्यात मुलांची परवानगी आवश्यक आहे हे पालकांना समजलं पाहिजे. अनेकदा मुलंही विशेषतः टीनएजर मुलं युट्युब चॅनल काढू म्हणून आईबाबांच्या मागे लागतात. अशावेळी युट्युब काढणं, चालवणं हे पूर्णवेळ काम आहे आणि शाळा चालू असताना करण्याची गोष्ट आहे की नाही याविषयी मुलांशी सविस्तर आणि विविध स्तरीय चर्चा होते का?

युट्युब आणि सोशल मीडियावरुन चटकन मिळणाऱ्या प्रसिद्धीची, वलयाची भुरळ सगळ्यांनाच पडलेली असते. शिवाय त्याला पैशांची जोड असते. या सगळ्यात आपण कशासाठी काय पणाला लावतो आहोत याचा विचार होणं अत्यावश्यक आहे.

आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे, मुलांना मुलांसारखं आपण वाढू देणार आहोत का? याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtuber instagram reality shows influencers social media children kids hldc psp
Show comments