Soft hydrated skin drink: आजकालच्या धावपळीच्या जीवनात सगळेच आपल्या लाइफस्टाईलमुळे वैतागलेले असतात. बरेच लोक वेगवेगळ्या अडचणींमुळे काही करू शकत नाहीत. प्रदूषणामुळे ही समस्या अधिक जास्त वाढली आहे. यामुळे त्वचा आणि आरोग्यासंबंधी समस्या अधिक वाढल्या आहेत. मात्र, आता काळजी करू नका, कारण पोषणतज्ज्ञांनी सांगितलेले सिक्रेट्स फॉलो करून तुम्ही शून्य रुपयात सुंदर त्वचा मिळवू शकता. आपण जे खातो पितो त्याचा शरीरावर आतून आणि बाहेरून परिणाम होतो. सुदृढ आरोग्यासाठी चांगला आहार महत्त्वाचा असतो. निरोगी त्वचेसाठी काॅस्मेटिक्स, क्रीम्स, लोशन्स महत्त्वाचे असतात हा गैरसमज आहे. खरंतर निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी फळं आणि भाज्यांचा रस पिणं महत्त्वाचं आहे. फळं आणि भाज्यांच्या रसामुळे शरीर आतून स्वच्छ होतं आणि चेहऱ्यावर चमक येते. आज आपण प्रसिद्ध ब्युटी इन्फ्लुएन्सर व डॉक्टरांच्या हवाल्याने स्किन केअरसाठी शून्य रुपयात करता येणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांनी सांगितले की, गाजर, बीटरूट, आवळा, कच्ची हळद आणि आले घालून बनवलेला ज्यूस त्वचेच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीला पोषक घटकांनी समृद्ध आहे. पोषणतज्ज्ञांनी सांगितलेलं पहिलं सिक्रेट म्हणजे, ज्यूस पिण्याची योग्य वेळ.. चांगल्या त्वचेसाठी सकाळी प्रथम हा ज्यूस घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यासाठी आणि पोटाची जळजळ कमी करण्यासाठी सकाळची वेळ ज्यूसचे सेवन करण्यासाठी योग्य आहे.
कसा बनवायचा ज्यूस?
साहित्य –
२-३ बीट
६-८ गाजर
५ आवळे
कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा,
आल्याचा एक छोटा तुकडा हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा ज्यूस काढून घ्या आणि त्यात थोडेसं मीठ टाकून तुम्ही याचे सेवन करू शकता.
आरोग्य फायदे काय आहेत?
१. गाजर : बीटा-कॅरोटीन जास्त असते. त्वचा दुरुस्ती, दृष्टी आणि प्रतिकारशक्ती यासाठी हे महत्त्वाचे आहे.
२. बीट : रक्तप्रवाह सुधारतो. ते त्वचेच्या आरोग्यासाठीदेखील मदत करते, कारण त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट असतात.
३. आवळा : कोलेजन उत्पादन आणि प्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन सी असते.
४. हळद : दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडेंट असते.
५. आले : पचनास मदत करते आणि आतड्यांच्या आरोग्यास समर्थन देते.
धोकाही लक्षात घ्या
“उच्च फायबर असलेल्या कच्च्या अन्नामुळे पोटात सूज येऊ शकते. आवळ्यासारखे पदार्थ रिकाम्या पोटी घेतल्यास पोटाच्या अस्तरांना त्रास होतो आणि अस्वस्थता येते. बीटरूट, हळद आणि आवळा यांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो. तसेत जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर हे पदार्थ टाळणेच योग्य आहे, असे पोषणतज्ज्ञ सांगतात.
चेहरा धुताना पाणी कसं असावं?
दुसरा महत्त्वाचा सल्ला आणि सिक्रेट म्हणजे चेहरा धुण्यासाठी थंड पाणीच वापरा. यामुळे चेहऱ्याला आलेली सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. आयुर्वेदात डोळ्यांना अग्नीचे स्थान मानले जाते, त्यामुळे डोळ्यांना थंड करण्यासाठी, आराम देण्यासाठी गार पाणी फायदेशीर ठरते.