गरोदरपणात महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आता त्यांच्या आरोग्याशी त्यांच्या मुलाचे आरोग्यही जोडले गेले आहे. अशा परिस्थितीत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या महिलांसमोर आव्हान वाढतं. ऑफिसमध्ये सुमारे ८-९ तास काम केल्यानंतर थकवा जाणवतो. हे टाळण्यासाठी त्यांनी दिवसभर काही न्युट्रिएंट्स घेत राहावे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गर्भवती महिलेला गरोदरपणाच्या पहिल्या सहा महिन्यांत अतिरिक्त कॅलरीजची गरज नसते. कारण तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान, स्त्रीचे शरीर अन्नातून आवश्यक ऊर्जा आणि पोषक तत्वे काढण्यात अधिक कार्यक्षम बनते. तसेच गरोदरपणात ऑफिसला जाणार्या महिलांसाठी डायट प्लॅन कसा असावा, हे जाणून घेऊयात…
भरपूर पाणी प्या
ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सर्वप्रथम पाणी प्यावे. गरोदरपणात भरपूर पाणी पिणे नेहमी चांगले. पाणी प्यायल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्या आणि कामाला लागण्यापूर्वी सफरचंद, डाळिंब किंवा केळी खा. हे आई आणि बाळ दोघांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय जेवणासोबत चहा किंवा कॉफी घेऊ नका याची विशेष काळजी घ्या, कारण यामुळे शरीर भाजीपाल्यातील लोह योग्य प्रकारे शोषून घेत नाही.
सकाळचा नाश्ता
गरोदर महिलांनी सकाळी सर्वप्रथम ग्रीन टी प्यावा. हे तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत करते. तर सकाळी नाश्त्यात पोळी, भाजी आणि उकडलेले अंडे खावे. दरम्यान ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यावर फळे, काजू आणि ताक यांचे सेवन करा. दुपारच्या जेवणासाठी भाजी पोळीचा डबा घ्यायला विसरू नका.
दुपारचे जेवण
दुपारच्या जेवणात तुम्ही भाजी पोळी, ताक आणि तुमच्या टिफिनमध्ये जे काही असेल ते नीट चावून खा. तसेच जेवताना कोणतीही घाई करू नका. जेवणासोबत सॅलड घ्या. दरम्यान प्रत्येक गरोदर महिलांनी त्यांच्या निरोगी आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तसेच वजन वाढण्यास मदत करण्यासाठी तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण कमी प्रमाणात घेतले पाहिजे.
संध्याकाळचा नाश्ता
ऑफिसमध्ये संध्याकाळचा नाश्ता म्हणून आपण अनेकदा समोसे, पकोडे हे खातं असतो, पण त्यापासून दूर राहायला हवे. तुम्ही सोबत आणलेले काजू ड्रायफ्रूट याचे सेवन करा. तसेच ऑफिसमध्ये जास्त करून चहा आणि कॉफी देखील प्यायली जाते, तर यावेळी गरोदर महिलांनी त्याऐवजी संत्र्याचा रस किंवा लिंबूपाणी सारखे व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पेय घ्या. हे तुमच्या शरीराला लोह शोषण्यास मदत करेल.
रात्रीचे जेवण
गरोदर महिलांनी रात्रीच्या जेवणासाठी निरोगी खावे. दिवसातून एकदा तरी तुमच्या आहारात डाळीचे सेवन करा. तसेच रात्रीच्या जेवणात तुम्ही ब्रोकोली, पनीर आणि बेबी कॉर्न, रोटी, सॅलड आणि यांचा भाज्यांमध्ये समावेश करून खाऊ शकता. तसेच रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नका, तर थोडे चालत जा. गरोदरपणात दूध तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्या.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)