Healthy Lifestyle Tips : कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन हा सर्वांत सोपा आणि सोईस्कर पर्याय आहे. त्यात अगदी कमी वेळात कपडे धुतलेही जातात आणि सुकूनही निघतात. पण, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना लोक काही वेळा निष्काळजीपणा करतात. त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. जर तुम्हीही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ‘या’ चुका करत असाल, तर त्या आजच थांबवा. कारण- त्या चुकांमुळे कपड्यांमध्ये जीवाणू वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी
१) कपडे धुतल्यानंतर मशीनचे झाकण काही वेळ उघडे ठेवा
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर झाकण लगेच बंद करू नका, असे केल्याने मशीनच्या तळाशी ओलावा राहतो, ज्याने जीवाणू आणि बुरशी वाढू शकते. विशेषत: फ्रंड लोड मशीनचे झाकण अशा प्रकारे डिझाइन केलेले असते की, त्यातून पाणी व हवा बाहेर येऊ शकत नाही, अशा मशीन ताबडतोब बंद केल्यास, त्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते. मग ते जीवाणू कपड्यांद्वारे तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशीनचे झाकण काही वेळ उघडे ठेवा; जेणेकरून आतील पाणी हवेने सुकेल आणि जीवाणू वाढण्याची शक्यता कमी होईल.
२) अंडरवेअर व मोजे इतर कपड्यांसह धुऊ नका
वॉशिंग मशीनमध्ये चुकूनही सर्व कपड्यांमध्ये मोजे किंवा अंडरवेअर धुऊ नका. त्यामुळे जीवाणू मशीनमधील सर्व कपड्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्वचेसंबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अंडरवेअर आणि मोजे नेहमी सर्व कपड्यांबरोबर एकत्रित न धुता वेगवेगळे धुवावेत. ते मशीनमध्ये एकत्र ठेवू नयेत.
३) बेडशीट्स, अंथरुणे धुण्यापूर्वी गरम पाण्यात भिजत ठेवा
बेडशीट्स किंवा नेहमीच्या वापरातील अंथरुणांमध्ये शेकडो जीवजंतू असतात. त्यामुळे अंथरुणे किंवा बेडशीट्स काही दिवसांनी धुणे आवश्यक आहे. पण जेव्हा तुम्ही बेडशीट्स किंवा अंथरुणे मशीनमध्ये टाकून थंड पाण्याने धुता तेव्हा त्यांची पूर्णपणे स्वच्छता होत नाही. त्यावरील माती, हट्टी डाग तसेच राहतात. त्यामुळे बेडशीट्स, अंथरुणे मशीनमध्ये धुण्याआधी ती गरम पाण्यात भिजवत ठेवा. त्यामुळे त्यातील जीवाणू वा जंतू नष्ट होण्यास मदत होते.
४) वॉशिंग मशीनची साफसफाई करणे
वॉशिंग मशीन आपले कपडे स्वच्छ धुण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. त्यामुळे मशीनही स्वच्छ करणे आवश्यक आहे. वॉशिंग मशीनमध्ये अनेक लहान-मोठी छिद्रे असतात. त्या छिद्रांमध्ये घाण, जीवाणू जमा होतात. ही घाण वा जीवाणू मशीनमध्ये कपडे धुतले जात असताना परत त्यावर चिकटते. म्हणून वॉशिंग मशीन स्वच्छ करणे आवश्यक आहे. कपडे धुऊन झाल्यानंतर मशीनमध्ये पुन्हा चांगले स्वच्छ पाणी टाकून, ती स्वच्छ केली गेली पाहिजे; जेणेकरून त्यात घाण अडकून राहणार नाही.