डॉ. संजीव कालकेकर                                                                                                                                            एकेकाळी हृदयविकार हा म्हातारपणी होणारा आजार समजला जायचा, मात्र आजकाल वयाच्या तिशीत असणाऱ्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास होणे ही बाब दुर्मीळ राहिलेली नाही. विशेषतः भारतात हृदयविकाराचे प्रमाण धोकादायक पातळीवर गेले असून त्यात पन्नाशीखालच्या रूग्णांचे प्रमाण मोठे आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, अगदी तरुण वयात म्हणजे विशीत असताना हृदय खराब होऊन निर्माण होणाऱ्या इमरजन्सी केसेसचे प्रमाण जास्त आहे.

भारतातील हृदयविकाराचे प्रमाण वाढण्यामागची बरीच कारणे आहेत, मात्र हा विकार होण्यामागे एक कारण सर्वाधिक जबाबदार आहे व ते म्हणजे जीवनशैलीत झालेले बदल. विशेषतः तरुण वयोगट  निरोगी, सक्रिय जीवनशैलीकडून जास्त तणावाच्या आणि उत्पादनक्षमतेवर भर देणाऱ्या आयुष्याकडे वळला आहे. याचाच अर्थ २५ ते ४० वर्ष वयोगटातील लोकांना पूर्वीपेक्षा जास्त तणाव व काळजीला सामोरे जावे लागते. कामगिरी उंचावण्याच्या नादात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे कमी झाले आहे. अती काम केल्यामुळे थकणारे व खाण्याच्या सवयी तसेच जीवनशैलीविषयक निवडी बदलण्यास असमर्थ ठरणारे रूग्ण आता नेहमीची बाब झाले आहेत.

आज उपलब्ध असलेल्या वैद्यकीय पर्यायांच्या मदतीने हृदयरोग कमी करणे तसेच त्याचे व्यवस्थापन करणे एका मर्यादेपर्यंत शक्य झाले असले, तरी उपाय करण्यापेक्षा प्रतिबंध करणे केव्हाही चांगले. धूम्रपान, सतत जंक फूड खाणे, मद्यपान करणे हे ताण कमी करण्याचे लोकप्रिय मार्ग बनले आहेत. यामुळे शरीरावर होणारे परिणाम सहजपणे दिसून येतात व ते म्हणजे, अकाली वृद्धत्व येणे, हृदय तसेच यकृत खराब होणे, वर दिलेल्या पर्यायांचा अतीवापर करण्यामुळे ताण हृदयापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.

हृदय हे शरीराचा महत्त्वाचा अवयव असून दैनंदिन कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याता त्याचा महत्त्वाचा वाटा असतो. खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली जाणीवपूर्वक बदलण्याने महत्त्वाच्या अवयवांचे कामकाज दीर्घकाळ चालू राहील याची खात्री करतायेते. भरपूर व्यायाम आणि त्याला योग्य आहाराची म्हणजेच हिरवा रंग, निरोगी फॅट्स, कडधान्ये व नट्स खाण्याची जोड दिल्यास हृदय आनंदी व निरोगी राहाते. फक्त मुठीच्या आकाराचे असलेले हृदय अतिशय सामर्थ्यशाली असते व त्याची काळजी घेतल्यास तुम्हाला स्थिर तसेच समृद्ध जीवन जगता येते.

(लेखक अपोलो हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहेत.)