नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी पन्नाशीच्या आत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अल्प होते; परंतु आता यामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. इंडियन हार्ट हेल्थ असोसिएशनचा अहवाल तर याबाबत धक्कादायक असून हृदयविकाराचा झटका आलेल्या एकूण लोकांपैकी तब्बल ५० टक्के हे केवळ वयाच्या पन्नाशीच्या आतील होते, असे स्पष्ट झाले आहे.
इंडियन हार्ट असोसिएशननुसार ५० पेक्षा कमी वयाच्या नागरिकांनाही ज्येष्ठ नागरिकांएवढाच हृदयविकाराचा धोका आहे. तर, ४० पेक्षा कमी वयाच्या २५ टक्के नागरिकांना हृदयविकाराचा झटका आला होता. महत्त्वाचे म्हणजे महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतात हृदयविकाराचे प्रमाण वाढण्यास मधुमेह कारण ठरत आहे, असे संशोधनानंतर स्पष्ट झाले आहे. देशातील १८ वर्षे वयाच्या तब्बल सात कोटी ७० लाख नागरिकांना मधुमेहाचा विळखा आहे. तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यपानही भारतात हृदयविकारास कारण ठरत आहे. विशेष म्हणजे योग्य वेळी या आजाराचे निदान होत नसल्यानेही झटका येण्याचे प्रमाण भारतात अधिक आहे.