फेब्रुवारी महिन्यापासूनच नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. सतत वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. यात मुंबई काही दिवसांत ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. यामुळे भारतीय हवामान विभागाने मुंबईत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणाही हा इशारा जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना दुपारी प्रखर उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. यात केरळमध्ये उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये उन्हाची हिच स्थिती आहे. केरळ राज्य व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दक्षिणेकडील राज्यातील काही भागात तापमान ५४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. अशापरिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यामुळे उष्माघाताची प्रकरणं वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी उष्णतेसंबंधीत आजारांपासून स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. यादरम्यान तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याची सुरुवातचं इतक्या लवकर झाल्याने परिणाम देखील गंभीर होणार असण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे शेती, सावर्जनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
सतत वाढणाऱ्या या तापमानात नागरिकांनी स्वत:ची योग्य काळजी कशी घ्यावी यासाठी काही सोपे उपाय आहेत. यात उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये हे सांगण्यात आले आहे. जाणून घेऊन नागरिकांनी उन्हाळ्यात स्वत:ची कशी काळजी घ्यावी.
उन्हाळ्यात काय करावे?
१) दिवसा सर्वात उष्णतेच्या वेळात विशेषत: दुपारी १२ ते ४ दरम्यान शक्यतो घरात रहा.
२) शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ, विशेषत: पाणी आणि ताज्या फळांचा रस प्या.
३) शरीर थंड ठेवण्यासाठी शक्यतो हलक्या रंगाचे, सैल कपडे घाला. जेणेकरून गरम होणार नाही.
४) सुर्याच्या हानीकारक किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा.
५) हलके जेवण घ्या. जड, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणं टाळा, यामुळे शरीरात उष्णता वाढते.
६) शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड शॉवर खाली अंघोळ करा, किंवा अंघोळीसाठी थंड पाणी वापारा.
७) घर किंवा ऑफिस थंड ठेवण्यासाठी पंखा, कुलर किंवा एसीचा वापर करा.
८) दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्यापूर्वी डोक्यावर टोपी किंवा स्कार्फचा वापर करा, किंवा सावलीसाठी छत्री घ्या.
उन्हाळ्यात काय करु नये?
१) अल्कोहोल किंवा कॅफिनयुक्त पेय पिऊ नका, यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
२) दिवसा सर्वात उष्ण भागांमध्ये शारीरिक कसरती करु नका.
३) लहान मुले, वृद्ध आणि पाळीव प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनांमध्ये बसण्यास जाऊ देऊ नका.
४) थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ नका.
५) थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखीसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
६) धूम्रपान करु नका किंवा तंबाखूजन्य पदार्थ वापरु नका, यामुळे उष्णतेशी संबंधीत आजारांचा धोका वाढतो.
७) योग्यपद्धतीने न साठवलेले आणि जास्त दिवस झालेले अन्नपदार्थ, पेय घेऊ नका.