Heatstroke Symptoms Treatment : एप्रिल महिन्यातच तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. बहुतांश जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला आहे. मुंबईतही उष्णता वाढू लागल्याने लोक उकाड्याने हैराण झाले आहे. कडक उन्हात शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत शरीराला हायड्रेट ठेवणं कठीण होऊन बसलं आहे. यात रोज तीव्र उन्हात फिरणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांना उष्माघाताचा धोका वाढतोय.
या उष्माघाताच्या धोक्यासंदर्भात मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयाचे सल्लागार व प्रमुख नेफ्रोलॉजिस्ट डॉ. शरद शेठ म्हणाले की, उन्हात जास्त वेळ राहिल्याने शरीराचे तापमान झपाट्याने वाढते. अशा वेळी शरीर त्या तापमानाशी जुळवून घेऊ शकत नाही, ज्यामुळे उष्माघात होतो. पण, उष्माघात झाल्यास कोणती लक्षणं दिसतात आणि उष्माघात कसा टाळता येऊ शकतो याविषयी जाणून घेऊ…
उष्माघात झाल्यास कोणती लक्षणं दिसतात?
१) जास्त घाम येणे
२) चक्कर येणे किंवा अस्वस्थता वाढणे
३) डोकेदुखी
४) त्वचा गरम होणे किंवा कोरडी पडणे
५) घाम न येताही शरीर गरम होणे
६) हृदयाचे ठोके वाढणे
७) चिडचिड होणे, चिंताग्रस्तता
८) स्नायुदुखी
९) मळमळ, उलट्या, पोटदुखी
१०) शरीराचे तापमान ४० अंश किंवा त्याहून अधिक होणे
उष्माघातापासून कसे वाचायचे?
१) उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी जास्त लिक्विड बेस पदार्थांचे सेवन करा. जास्त प्रमाणात पाणी प्या, लिंबू पाणी, नारळ पाणी, आंबा पन्हे प्या.
२) फ्रूट्स ज्यूस जास्त प्या. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटची कमतरता पूर्ण होईल आणि शरीर हायड्रेटेड राहील. तसेच ओआरएसचे पाणी प्या. त्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राखले जाईल. उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज यांसारखी भरपूर पाणी असलेल्या फळांचा आस्वाद घ्या.
३) उष्णतेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी शक्यतो कडक उन्हात जाणे टाळा आणि थंड तापमानात राहा.
४) सुती कपडे घाला; जेणेकरून घाम व्यवस्थित शोषला जाईल आणि त्वचा निरोगी राहील.
५) सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क टाळण्यासाठी सन ब्लॉक आणि टोपी घाला.
उष्माघाताविरोधात ‘या’ टिप्स ठरतील प्रभावी
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी दही, ताक यांचे सेवन करा. दही आणि ताकातील थंडाव्यामुळे शरीराला आतून थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात दही किंवा ताक खाल्ल्याने शरीराचे तापमान कमी होते आणि शरीर हायड्रेट राहते.
अॅलोव्हेरा जेलचे सेवन करा
उन्हाळ्यात कोरफडीचे जेल त्वचेला थंड करण्याचे काम करते आणि तापमान संतुलित ठेवते. तुम्ही कोरफडीचे जेल खाऊही शकता.