झोप ही निरोगी शरीरासाठी खूप महत्वाची असते. शारीरिक वाढ, जखमा किंवा शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी तसेच आवश्यक ती संप्रेरके शरीरामध्ये योग्य प्रमाणात तयार होऊन त्याचा योग वापर होण्यासाठी झोप महत्वाची असते. मात्र पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात. याच संदर्भात ‘एक्सप्रेस डॉट को डॉट यूके’ आणि मानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या ‘थिंक वेल स्लीप वेल’ मोहिमेचे अॅम्बॅसिडर होप बॅस्टिन यांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये झोप कमी होत असल्याच्या लक्षणांबद्दल अहवाल सादर करण्यात आला. जाणून घेऊयात झोप कमी होत आहे हे कसे ओळखावे याबद्दल…
सर्दी आणि ताप
झोप कमी झाल्यास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जेव्हा एखादी व्यक्ती झोपेत असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे काही विशिष्ट प्रकारची द्रव्य घटक (साइटोकिन्स) आणि संसर्गजन्य रोगांशी लढणाऱ्या अॅण्टीबॉडीज तयार होतात. ज्यामुळे बॅक्टेरिया आणि इतर विषाणूंपासून आपला बचाव होतो. मात्र झोप न झाल्यास ही सर्व क्रिया बंद होऊन सर्दी आणि तापासारखे आजार वारंवार होतात. तसेच पूर्ण झोप न घेतल्यास आजारपणामधून लवकर बरे होता येत नाही. म्हणूनच आजारी व्यक्तींना जास्तीत जास्त वेळ झोपण्याचा सल्ला दिला जातो.
गर्भधारणेत अडचणी
पुरेसी झोप न मिळाल्यास पुरुषांची प्रजननशक्ती कमी होते. कमी झोप घेणाऱ्या पुरुषांच्या प्रजनन शक्तीवर थेट परिणाम होत असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. २०१३ साली युनिव्हर्सिटी ऑफ साऊदर्न डेन्मार्कने केलेल्या एका अभ्यासामध्ये ज्या पुरुषांची झोप कमी आहे, त्यांच्यामधील शुक्राणुंचे प्रमाण हे नियमीत पुरेसी झोप घेणाऱ्या पुरुषांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले होते.
उच्च रक्तदाब
जे लोक कमी कालावधीसाठी झोपतात त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते असे बॅस्टिन म्हणतात. तसेच कमी झोप घेतल्यास रक्तदाबावर परिणाम होतो आणि उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. ठराविक तास झोप घेतल्यास रक्तामध्ये असणारे काही विशिष्ट संप्रेरकांचे प्रमाण टिकून राहते. व्यवस्थित झोप घेतल्यास मज्जासंस्थाही निरोगी राहते. मात्र कमी झोपेची सवय लावून घेतल्यास विषम प्रमाणातील संप्रेरकांमुळे ताणतणाव वाढतो आणि उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होतो.
वजन वाढणे
सहा तासांपेक्षा कमी वेळ झोपणाऱ्या व्यक्तींना वजन वाढण्यासंदर्भातील समस्यांना समोरे जावे लागते. या लोकांची भूक कमी होते मात्र शरीरातील संप्रेरकांचे प्रमाण कमी जास्त झाल्याने वजन वाढते. म्हणून कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आहे.
त्वचेशी संबंधित आजार
जर योग्य झोप घेतली नाही तर त्याचे परिणाम त्वचेवर दिसून येतात. कमी काळ झोपणाऱ्यांच्या चेहऱ्यावर वारंवार पिपल्स येतात. झोपेमुळे शरीरातील संप्रेरकांचे प्रमाण बिघडल्यास त्याचे परिणाम त्वचेवर दिसून येतात. कमी झोपणाऱ्यांच्या त्वचेवर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण जास्त असते.
तुमच्यामध्ये ही सर्व किंवा यापैकी एखादे लक्षण दिसत असल्यास तुमचे वेळापत्रक बदलून झोपेच्या वेळेशी तडजोड न करता पूर्ण वेळ झोप कशी घेता येईल याकडे खास लक्ष द्या.