नवीन वर्ष जसे जसे जवळ येऊ लागले आहे अनेकांनी न्यू इयर रेझोल्यूशनचा विचार सुरु केला आहे. हे रेझोल्यूशन अगदी डायरी लिहीण्यापासून ते व्यायमापार्यंत आणि पैसे वाचवण्यापासून एखादी गोष्ट मिळवण्यापर्यंत अनेक प्रकारचे असू शकते. अनेकदा हे काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी काही रेझेल्युशन्स जी तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने फायद्याची तर आहेतच शिवाय त्यामधील सातत्य राखण्यासाठी तुम्हाला जास्त कष्टही घ्यावे लागणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात या दुहेरी फायदा असणाऱ्या रेझोल्यूशन्सबद्दल…
जेवणामधील हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा
घासपूस असं ज्या भाज्यांना विनोदाने म्हटले जाते आणि अनेकांना ज्या आवडत नाहीत अशा हिरव्या भाज्यांचे जेवणातील प्रमाण वाढवा. इंटरनेटवर छान रेसिपीज शोधून नवीन पदार्थांच्या माध्यमातून तुम्ही या भाज्यांचे आवडीने सेवन करू शकता. हिरव्या भाज्यांच्या सेवनाने शरिराला आवश्यक असलेल्या महत्वाच्या घटकांचा पुरवठा होतो.
विकेण्डला किंवा सुट्टीच्या दिवशी काम नको
एकच काम सतत केल्याने त्याचा कंटाळा येतो म्हणूनच विकेण्डचा ब्रेक आवश्यक असतो. त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होते. फोन, लॅपटॉप लांब ठेऊन विकेण्डला किंवा सुट्टीच्या दिवशी नुसता आराम करा. एखादा छंद जोपासा, नवीन जागी भटकायला जा, पुस्तके वाचा, डान्स क्लास लावा ज्यामुळे तुम्हाला रिफ्रेश झाल्यासारखे वाटेल अशा अॅक्टीव्हीटीजला प्राधान्य द्या.
सकारात्मक दृष्टीकोन ठेवा
कोणत्याही गोष्टीवर रिअॅक्ट होताना उगचं नकारात्मक विचार करणे नवीन वर्षांमध्ये बंद करा. चेहऱ्यावर थोडं हसू ठेऊन संकटांनाही धीराने सामोरे जा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास उदास वाटत नाही आणि मानसिक आजारांपासून दूर राहता येते. एखाद्या गोष्टीवर घाईघाईत रिअॅक्ट होऊ नका, पूर्ण विचार करून रिअॅक्ट व्हा ज्यामुळे आपोआपच तुमची सकारात्मक्ता वाढेल.
रोज कमीत कमी ५ ते १० मिनिटे ध्यान करा
मन:शांतीसाठी दिवसातून किमान पाच ते दहा मिनिटे स्वत:साठी राखून ठेवा आणि त्यावेळात निवांत डोळे बंद करुन बसा. दिवसभर झालेल्या धावपळीनंतर शांततेसाठी किंवा समोर असलेले कामाचे वेळापत्रक पाळण्यासाठी हा स्वत:साठी काढलेला पाच ते दहा मिनिटांचा वेळ फायद्याचा ठरतो. यामुळे मनातील अनेक नको असलेले विचार निघून जाण्यास मदत होते. आणि नवीन जोमाने काम करता येते.
सोड्याला करा बाय बाय
सोड्याचे दुष्परिणाम अनेकांना ठाऊक आहेत. त्यामुळेच शरिराला त्रास करुन घेण्याऐवजी सोडा असणारे पेय सोडून द्या. अगदी एका झटक्यात हे शक्य नसले तरी हळूहळू या पेयाचे सेवन कमी करुन ते पूर्णपणे सोडून द्या. सोडा असणाऱ्या पेयाऐवजी ग्रीन टी, सरबत पिण्यास सुरुवात करा.
७ ते ८ तास झोपा
झोप म्हणजे सुख आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. भूक आणि झोपेबद्दल कधीच तडजोड करु नका. रात्री दिवे सुरु ठेऊन झोपण्याऐवजी दिवे बंद करुन झोपल्यास जास्त छान झोप लागेल. कमीत कमी सात ते आठ तास झोप घेतल्यास दिवस चांगला जातो, थकवा जाणवत नाही आणि कामातील प्रोडक्टीव्हीटी वाढते. त्यामुळे नित्याची कामे वेळेत उरकून लवकर झोपल्यास दुसरा दिवस उत्सहात जातो.