सार्वजनिक ठिकाणी फ्री वायफाय म्हटल्यावर अनेकांच्या त्यावर उड्या पडतात. काही क्षणात कनेक्ट करून अगदी अॅप्स अपडेट करण्यापासून व्हॉट्सअॅप चॅटपर्यंत सर्व काही फुकट वापरण्याची सुवर्ण संधी साधणारे अनेकजण आहेत. मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे फ्री वायफाय स्मार्टनेटकऱ्यांना चांगलेच ‘माहागात’ पडू शकते.
आज अनेक हॉटेल्स, कॉफी शॉप्स, मॉल्स, क्लब्सबरोबरच अगदी रेल्वे स्थानकांवरही फ्री वायफायची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय काही शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी वायफायची सोय उपलब्ध करून देण्यात आलीय. मात्र हे फ्री वायफाय झोन तयार करताना बहुतांश ठिकाणी या वायफाय नेटवर्कच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा किंवा फायर वॉल उभारलेली दिसत नाही. म्हणूनच हे फ्री वायफाय झोन्स हॅकर्ससाठी फुकट डेटा चोरीची आयती ठिकाणे असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरण्याच्या दहा खास टीप्स
> अगदीच गरज असेल तरच सार्वजनिक ठिकाणावरील फ्री वायफाय वापरा
> वायफायच्या नावाची संबंधीत ठिकाणावरील अधिकाऱ्यांकडून एकदा खात्री करून घ्या
> फ्री वायफायवर असताना पासवर्ड बदलणे, ऑनलाइन शॉपिंग करणे, अकाऊंट तयार करण्यासारख्या गोष्टी टाळा
> उपलब्ध वायफाय किंवा हॉटस्पॉटला ऑटोमॅटीकली कनेक्ट करणारी सेटिंग बंद ठेवा
> व्हर्चूअल प्राइव्हेट नेटवर्कवरून सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरता येते; हे अधिक सुरक्षित असते.
> मोबाईलमध्ये फायर वॉल सुरू ठेवा
> चांगला अॅण्टीव्हायरस वापरा
> गरज नसताना किंवा वापरात नसताना फोनमधील वायफाय बंद करा
> https वेबसाईट वापरा त्या सर्वाधिक सुरक्षित असतात
> हल्ली हॉटस्पॉट डिव्हास उपलब्ध आहेत. सार्वजनिक ठिकाणावरील वायफाय वापरण्याऐवजी या हॉटस्पॉटवरून जास्त सुरक्षित पद्धतीने नेट सर्फिंग करता येते
हॅकर्स कशाप्रकारे चोरतात डेटा…
फ्री वायफाय वपरून एक खोटा होस्ट किंवा वायफाय नेटवर्क तयार करतात. या नेटवर्कचे नाव जाणून बुजून Free_wifi_City, Free_wifi_Hotel यासारखी ठेवण्यात येतात. नावांमुळे अनेकांना खोटा होस्ट असणारी ही नेटवर्कस् खरी वाटतात. एकदा युझर या नेटवर्कला कनेक्ट झाला की त्याच्या मोबाईलवरील प्रत्येक हलचाल हॅकर्सला समजते. आज जगभरात फ्री वायफायची सुविधा देणारे अनेक एअरपोर्ट, हॉटेल्स, मॉल्स, शैक्षणिक संस्था किंवा अगदी स्थानिक प्रशासन आहेत. परंतु ही सुविधा वापरून नेटकरी काय अॅक्सेस करत आहेत याकडे त्यांचे फार लक्ष नसल्याचे चित्र पाहायला मिळते. याचा फायदा घेत हॅकर्स लोकांचा डेटा चोरतात.