High BP Issue During Pregnancy: गरोदरपणामध्ये विशिष्ट हार्मोन्समुळे महिलांच्या शरीरामध्ये बदल होत असतात. अशा वेळी शरीरामध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. या नऊ महिन्याच्या काळात गर्भामध्ये बाळाची वाढ होत असताना स्वत:ची आणि त्या बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी त्या आईवर असते. गरोदर असताना महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. बहुतांश गर्भवती महिलांना हा अनुभव येत असतो. उच्च रक्तदाबामुळे बाळासह आईच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपाय करुन रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते.
गरोदर असताना उच्च रक्तदाबाचा त्रास का होतो?
गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाची समस्या होणे सामान्य असते. यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळेस हार्मोनल बदलांमुळे हा त्रास सुरु होतो. तर कधी-कधी ताणतणाव, स्थूलता या गोष्टींमुळे रक्तदाब नियंत्रणामध्ये राहत नाही. पहिल्यांदा गर्भवती असताना ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. गरोदरपणात शारीरिक हालचाल न झाल्यानेही अशा गोष्टी घडत असतात.
उच्च रक्तदाब म्हणजेच High BP वर नियंत्रणात राहावे यासाठी काय करावे?
जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे.
शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मीठ असल्यास उच्च रक्तदाबाची समस्या सुरु होते. अशा वेळी आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे. पर्याय म्हणून Low Sodium Salt चा वापर करता येतो.
सकस आणि पौष्टिक आहार घ्यावा.
गरोदरपणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. गर्भवती महिलांनी नऊ महिन्यांच्या काळामध्ये पौष्टिक आहार घेण्यावर भर द्यावा.
कॅफीनयुक्त पदार्थ टाळावे.
गरोदर असताना चहा, कॉफी अशा कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. हे जमत नसल्यास किमान त्यांचे प्रमाण कमी करावे. त्याशिवाय सॉफ्ट डिंक्स न पिणेदेखील फायदेशीर ठरते. शरीरामध्ये कॅफीनचे प्रमााम कमी असल्यास उच्च रक्तदाबासह अन्य समस्या कमी होतात.
चालायला जावे.
गर्भवती महिलांनी रक्तदाबाशी संबंधित समस्या होऊ नये यासाठी अनवाणी पायांनी गवतावर चालावे. असे केल्याने मन शांत राहायला मदत होते. चालण्याव्यतिरिक्त मेडिटेशन करणे, गाणी ऐकणे यांमुळे ताणतणाव नाहीसा होतो.
आणखी वाचा – गरोदरपणात तूप खाल्ल्याने प्रसूती वेदना कमी होतात का? काय सांगतात डॉक्टर, जाणून घ्या
व्यायाम करणे.
व्यायामामुळे शरीराला अनेक फायदे होत असतात. गरोदरपणामध्ये शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी होते. अशा वेळी शक्य तितक्या प्रमाणात व्यायाम करावा. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो. त्याव्यतिरिक्त मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)