रक्तदाब हा असा एक आजार आहे जो अतिशय संथ गतीने रुग्णाच्या आरोग्याला हानी पोहचवत असतो. म्हणूनच या आजाराला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. भारतात आणि जगभरात रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आकडेवारीनुसार प्रत्येक चार पुरुषांमध्ये एका पुरुषाला उच्च रक्तदाबाची समस्या असते. तर जगभरात जवळपास एक अब्जाहूनही अधिक लोकांना उच्च रक्तदाब आहे. वाढता तणाव, चुकीचा आहार, अयोग्य जीवनशैली आणि आहारात मिठाचे अतिसेवन यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्याही व्यक्तीचा सामान्य रक्तदाब १२०/८० mmHg असावा. रक्तदाबाची पातळी याहून अधिक असेल तर व्यक्तीला शारीरिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. रक्तदाब वाढल्यावर आपल्या शरीरात काही विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. यावेळी अंगदुखी, डोकेदुखी आणि अंधुक दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात.

अतिरिक्त तणाव आणि आहारातील मिठाचे प्रमाण जास्त असल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब पातळीमुळे हृदय, मेंदू आणि किडनीचा आजार होण्याचा धोका असतो. जर तुम्हालाही उच्च रक्तदाबाची समस्या असेल आणि तुम्हाला त्यावर नियंत्रण मिळवायचे असेल, तर नियमितपणे रक्तदाब तपासणे आवश्यक असते. असे केल्याने रक्तदाबामधील वाढ आणि घट आपल्याला कळू शकते. उच्च रक्तदाबाचे रुग्ण रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काही सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकतात. यासाठी महागडी औषधेही घेण्याचीही गरज नाही. जीवनशैलीतील लहानसे बदल उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेसे आहे.

हेही वाचा : Women Health: योनीतुन होणाऱ्या स्रावाचा रंग कोणता असावा? गंभीर आजाराची प्रमुख लक्षणे वेळीच ओळखा

  • कोमट पाण्याने अंघोळ करून आराम करणे

जर तुम्हाला रक्तदाब वाढल्यासारखे जास्त वाटत असेल तर कोमट पाण्याने आंघोळ करून विश्रांती घ्यावी. थकवा आणि तणाव हे रक्तदाब वाढण्याचे सर्वात मोठे कारण असू शकते. जर तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ करून विश्रांती घेतली तर तणाव कमी होईल आणि तुमचा रक्तदाब देखील सामान्य होईल.

  • दीर्घ श्वास घेणे

रक्तदाब वाढल्यास भीती वाटणे, डोकेदुखी आणि चक्कर येणे अशा समस्या जाणवतात. या परिस्थितीत रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेऊन तो दोन सेकंद धरून ठेवा, नंतर श्वास सोडा. असे केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

  • निरोगी आहार घ्या

रक्तदाब नियंत्रित करण्यात निरोगी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्हालाही उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास धान्य, फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करावा. तसेच जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करावे.

यावर्षीचं शेवटचं ‘पूर्ण चंद्रग्रहण’ भारतातील कोणत्या भागांमध्ये दिसणार? महाराष्ट्रातील वेळही जाणून घ्या

  • वजन कमी करणे

तुमचा रक्तदाब सातत्याने वाढत असेल तर तुमचे वजन नियंत्रित ठेवा. वाढत्या वजनामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि धाप लागते. वाढते वजन कमी करून तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता.

  • कॅफिनचे प्रमाण कमी करावे

जर रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर कॅफिनचे सेवन कमी करावे. चहा आणि कॉफीचे जास्त सेवन केल्याने तुमची रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High blood pressure problem can be reduced without consuming expensive medicines find out how pvp