राग, संताप किंवा ताणतणावांचा आपल्या मनावर होणारा परिणाम प्रभावीपणे व्यक्त करणारा शब्द म्हणजे ब्लड प्रेशर. नेहमीच्या गंभीर संभाषणात येणारा हा शब्द जेव्हा विकाराच्या रूपात आपल्या आयुष्यात येतो तेव्हा मात्र आपण त्याला तेवढे गांभीर्याने घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. अतिरक्तदाबाच्या एकूण रुग्णांपकी ५० टक्के लोकांना त्याची जाणीवच नसते. निदान झालेल्या ५० टक्क्यांपकी अर्धी मंडळी म्हणजे २५ टक्के लोक त्यांच्या डॉक्टरांनी तुम्हाला उच्चरक्तदाब आहे याची कल्पना देऊनसुद्धा औषध न घेता ‘देखा जायेगा’ संस्कृती जोपासणारे असतात, बेफिकीर असतात व त्यामुळे औषधोपचार करीत नाहीत. औषधोपचार घेणारी २५टक्के मंडळी नियमितपणाच्या बाबतीत काही प्रमाणात निष्काळजीपणा करतात त्यामुळे  फक्त अध्र्याच रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात असतो. हे चित्र बदलायला हवे.  त्यासाठी डॉक्टरकडे जाऊन रक्तदाब मापन नियमितपणे करायला हवे व रक्तदाब वाढलेला आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागायला हवे.
आनुवंशिकता, मद्यपान,  धूम्रपान, तंबाखू सेवन, ताणतणाव, अति वेगवान जीवनशैली, अतिलठ्ठपणा, मधुमेह, अति कोलेस्टेरॉलमयता व असंतुलित आहार हे घटक अतिरक्तदाबास पूरक आहेत.
 आरोग्याबद्दल बेफिकिरी,  ताणतणावाला पूरक जीवनशैली व असंतुलित आहार यामुळे शहरी विभागात अतिरक्तदाबाचे प्रमाण जास्त आढळते. आपल्या चुकीच्या जीवनशैलीबद्दल बहुतेक वेळी जागृत होण्याची वेळसुद्धा चाळिशीनंतरच असते. अचानकपणे आम्ही तळलेले बंद करतो. पहाटेला अनियमित का होईना फिरायला जातो.  व्यसने असल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दूधखुळा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत शरीराचे बरेच नुकसान झालेले असते.
महत्त्वाचे मुद्दे
आहारातील मिठाचे प्रमाण उच्चरक्तदाब नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते .  उच्चरक्तदाबामध्ये दिवसात ३-५ ग्रॅम्सपर्यत मीठ घेता येते . दही िलबू कोशिंबिरीचा वापर करून मिठाची उणीव भरून काढता येईल .  मोड आालेली कडधान्ये, हिरव्या भाज्या फळे यांचा वापर करून आहार संतुलित ठेवता येईल. अतिरक्तदाबाच्या रुग्णाने लोणची, पापड,म् चटण्या, वेफर्स, फरसाण इत्यादी मिठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ वज्र्य करावे हे उत्तम . स्निग्धपदार्थसुद्धा टाळणे आवश्यक आहे तळलेले पदार्थ तेल तूप लोणी  विशेषत बाजारात मिळणारे मीठयुक्त लोणी, चीज, साय यांचा वापर अतिशय माफक प्रमाणात हवा. आवश्यक असल्याशिवाय साखर वापरू नये .  
लठ्ठ आणि स्थूल व्यक्तींनी वजन कमी करणे अतिशय महत्वाचे आहे . आहाराला व्यायामाची जोड सर्वमान्य प्रभावी उपाय आहे मद्यपान, धूम्रपान आणि तंबाखूसेवन ही व्यसने अतिरक्तदाबासाठी अतिशय हानिकारक आहेत. स्वास्थ्य टिकविण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे . दिवसाकाठी कमीत कमी ४० ते ५० मिनिटे व्यायाम करावा. चालणे हा व्यायामाचा एक उत्कृष्ट प्रकार आहे. उच्चरक्तदाब व मानसिक ताणतणाव याचा अतिशय जवळचा संबंध आहे. स्पर्धात्मक जीवन पद्धतीत मानसिक ताण ही नित्याची बाब झाली आहे . तरी ताणतणाव कमी करण्यासाठी आत्मपरीक्षण,  तर्कशुद्ध विचारसरणी आणि आत्मविश्वास या त्रिसूत्री कार्यक्रमाला व्यायाम व योगाची जोड मिळाली की अशक्य वाटणारी गोष्ट सहज साध्य होईल.
प्रत्येक रुग्णाने स्वत एका नोंदवहीत आपल्या रक्तदाबाची नोंद ठेवावी. घेत असलेल्या औषधांची नावं व प्रमाण लिहून ठेवावे .  
रोगप्रतिबंधक कार्यक्रमात लसीकरणाला प्राधान्य दिले जाते आणि ते योग्यच आहे परंतु इतर गोष्टी अगदीच बासनात गुंडाळून ठेवणे योग्य नव्हे. जीवनशैलीमुळे होणारे आजार आपल्या तरुण पिढीचे आयुष्य पोखरते आहे. त्यामुळे त्यासंबंधी प्रतिबंधक उपाययोजना आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असायला ृहवी.  आमच्या नियोजनात आमूलाग्र बदल गरजेचा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला या धोक्याची जाणीव करून द्यायला हवी. असे आजार मोठेपणी होतात म्हणून बालवयात मजा करू द्या, हा विचार सोडायला हवा.
हे लक्षात ठेवा..
अतिरक्तदाब हा गंभीर विकार आहे. त्याला कमी लेखू नका. नियमित औषध, नियमित रक्तदाब मापन, आहारातील पथ्य याला पर्याय नाही. अतिरक्तदाब समूळ बरा होत नाही. औषधाची वेळ डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा. औषधांच्या आनुषंगिक परिणामांची माहिती मिळवा. संपूर्ण बरे वाटत असले तरी औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा