एचआयव्हीचा विषाणू शरीरात पसरण्याआधीच त्याला रोखण्याची युक्ती संशोधकांनी शोधली आहे. एचआयव्ही विषाणू हा शरीराच्या प्रतिरक्षा यंत्रणेवर हल्लाबोल करीत असतो, पण त्याआधीच त्याची घोडदौड रोखणे शक्य आहे. जेव्हा एचआयव्ही विषाणू पेशींना संसर्ग करतो तेव्हा तो पेशीच्या केंद्रकापर्यंत झटकन पोहोचतो; त्यामुळे उपचार सुरू करेपर्यंत उशीर झालेला असतो. शिकागोतील लोयोला विद्यापीठाच्या संशोधकांनी असे प्रथिन शोधले आहे जे या विषाणूची आगेकूच रोखू शकते. हे प्रथिन काढून घेतले तर हा विषाणू सायटोप्लाझममध्येच रोखला जातो व तेथे विषाणूपासून संरक्षण करण्याची नैसर्गिक प्रणाली त्याच्यावर हल्ला करते. या विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक एडवर्ड कॅम्पबेल यांनी सांगितले, की विषाणूची प्रसार रोखण्याची ही युक्ती महत्त्वाची आहे. एचआयव्ही हा टी पेशींसह सर्वच पेशांना बाधित करीत असतो. त्यामुळे माणसाची प्रतिकारशक्ती क्षीण होऊन इतर रोग जडतात, त्यात जीवाणूजन्ये रोगांचाही समावेश असतो. एचआयव्हीचा विषाणू ज्यावर स्वार होऊन भ्रमंती करतो ते बायकॉडल डी २ प्रथिन संशोधकांनी ओळखले असून ते काढून टाकले तर हा विषाणू पुढे जाऊच शकत नाही. यात असे औषध तयार करता येणार आहे, की ज्यामुळे हा विषाणू बायकॉडल डी २ या प्रथिनाच्या मदतीने शरीरात संचार करू शकणार नाही. यामुळे पेशींना विषाणूविरोधी जनुके तयार करण्यास अवधी मिळेल व एचआयव्हीचा संसर्गही लवकर होऊ शकणार नाही.
एचआयव्हीचा संसर्ग रोखण्याची युक्ती दृष्टिपथात
एचआयव्हीचा विषाणू शरीरात पसरण्याआधीच त्याला रोखण्याची युक्ती संशोधकांनी शोधली आहे.
आणखी वाचा
First published on: 06-12-2017 at 03:15 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hiv spreading issue