कुठल्याही सणाच्या निमित्ताने केले जाणारे खास पदार्थ हे त्या सणाचं खास वैशिष्ट्य असतं. त्या त्या सणाच्या वेळेस केले जाणारे हे पदार्थ चवदार तर असतातच पण त्या ऋतुमधला तो एक वैशिष्ट्यपूर्ण आहार असतो. होळीनिमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी कटाची आमटी तयार केली जाते. ही झक्कास कटाची आमची कशी तयार करतात जाणून घेऊयात याची पाककृती

पुरणपोळीचं पुरण करताना सुरूवातीला आपण हरभऱ्याची म्हणजेच चण्याची डाळ शिजत घालतो तेव्हाच जास्त पाणी घालून डाळ शिजवावी. डाळ शिजली की गूळ घालण्याआधी डाळीच्या वरचं पाणी अलगद काढून घ्यावं. त्यात थोडी डाळ आली तरी चालते. यावेळी मोठ्या स्टीलच्या गाळण्यातून गाळून पाणी वेगळं केलं तरीही चालतं. या पाण्यालाच ‘कट’ असं म्हणतात. याच पाण्याचा आमटीसाठी उपयोग करायचा आहे.

कटाच्या आमटीचे साहित्य:

१. कट

२. कांदा

३. सुके खोबरे

४. लसूण

५. आलं

६. गरम मसाला पावडर

७. लाल तिखट

८. धणे-जिरे पावडर

९. मीठ

१०. पुरण

११. तेल

१२. कोकम

कृती:

१. अख्खा कांदा थोडंसं तेल लावून सालासकट गॅसच्या ज्वाळांवर भाजून घ्यावा. अशाच प्रकारे खोबऱ्याचा तुकडाही भाजून घ्यावा.

२. साल काढून कांद्याचे तुकडे करावेत. खोबऱ्याचेही तुकडे करावेत.

३. मिक्सरमध्ये कांदा, खोबरं, लसूण आणि आलं यांची पेस्ट करून घ्यावी.

४. गॅसवर भांडं ठेवून त्यात तेल टाकावं. मोहरी, हिंग, जिरं, कढीपत्ता आणि हळद घालून फोडणी टाकावी.

५. डाळीचा कट फोडणीत घालून लगेचच त्याला मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण लावावं आणि उकळी येऊ लागताच त्यात गरम मसाला पावडर, लाल तिखट, धणेजिरे पावडर, मीठ घालून चांगली उकळी येऊ द्यावी. पुढे मंद आचेवर आमटी उकळू द्यावी

६. आमटी चांगली उकळल्यावर त्यात थो़डेसे तयार पुरण (एका लिंबाएवढं) घालावं व आणखी १-२ मिनिटं उकळावं.

७. आता ३-४ कोकम (आमसुलं) घालून गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी आणि पुरणपोळीबरोबर सर्व्ह करावी

कटाची आमटी जरा पातळसर ठेवावी कारण गार झाल्यावर ती खूप घट्ट होते.

तर बघताय काय! होळी आणि धुळवडीच्या रंगासोबत झक्कास मराठमोठी कटाची आमटी करा आणि कुटुंबासोबत मस्त ताव मारा!

Story img Loader