Happy Holi 2022 : वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा होळीचा सण त्यापैकीच एक. देशभरात होळी उत्साहात साजरी होती. भारतासोबतच अन्य काही देशांमध्येही उत्साहाने होळी साजरी केली जाते. अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी प्रजलवित करण्यात येते. याला शिमगा असेही संबोधले जाते. जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे. साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे.
शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने शेतकरी जाळून टाकायचे. यामुळे शेतजमीनी अधिक सुपीक व्हायच्या. पारंपारिक होळीत झाडांच्या सुक्या काट्या, गोवऱ्या इत्यादी जाळलं जातात. गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते. त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने कडूनिंब-एरण्ड यांसारखी औषधी झाडांचं लाकूडही जाळलं जायचं. हे जाळण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. थंडीनंतर सुरु होणार्या उन्हाळ्याच्या ऋतुसंधिकाळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते.
(हे ही वाचा: Hoil 2022: यंदा कधी साजरी होणार होळी? जाणून घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त)
या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हादेखील एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा; पर्यावरणाला अनुरूप असा उत्सवाचा विधी होता. परंतु आता मात्र पारंपारिक होळीच स्वरूपच पूर्णपणे बदललं आहे. आता होळीसाठी सर्रास झाडांची कत्तल केली जाते, तसेच होळी पेटवताना त्यात प्लॅस्टिक, टायरदेखील जाळले जाते त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजी ती अधिक दूषित होतं जाते.