भारतभर काल होळीला दहन करत सण साजरा केला गेला. आता आज रंगपंचमीचा सण धुमधडाक्यात साजरा होयला सुरुवात झाली आहे. आपल्यासारख्या बहुसंख्य शहरी लोकांसाठी आपले मित्र आणि शेजारी यांच्यासोबत रंग खेळून मजा करण्याचे हे अजून एक निमित्त आहे. बदलत्या काळानुसार होळीमध्येही बदल झाले आहेत. एके काळी होळीचा सण फुले व नैसर्गिक घरगुती रंगांनी खेळला जायचा. त्याची जागा आता रासायनिक रंग, पाण्याचे फुगे आणि फॅन्सी पाण्याच्या पिचकाऱ्यांनी घेतली आहे. याचा साहजिक परिणाम म्हणजे डोळ्यांना होणाऱ्या इजा. रंग खेळताना इजा झाल्यास नक्की काय करावे हे जाणून घेऊयात डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या रिजनल हेड, डॉ. वंदना जैन यांच्याकडून.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. वंदना जैन सांगतात की, “डोळ्यांवर तत्काळ उपचार केले नाही तर त्यांचा दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मुंबईसारख्या महानगरात शारीरिक इजा झाल्यामुळे डोळ्यांना होणाऱ्या इजांचे प्रमाण कमी झाले आहे. मोठ्या शहरांमध्ये पाण्याच्या फुग्यांचा वापर करण्याचे प्रमाण घटल्यामुळे हे झाले असेल. होळीशी संबंधित डोळ्यांच्या गंभीर इजांचे प्रमाण घटले असले तरी होळीनंतरचे पुढील काही दिवस मुले आणि तरुण डोळ्यांमध्ये झालेला लालसरपणा, चुरचुरणे, प्रकाशाचा त्रास होणे इत्यादी तक्रारी घेऊन येत असतात. यापैकी बहुतेक त्रास हा गुलाल वा रंग डोळ्यात गेल्याने किंवा चुकून बोट डोळ्यात गेल्याने होतो.”
 
त्या पुढे सांगतात, “तुमच्या डोळ्यात रंग गेले तर डोळे चुरचुरू शकतात किंवा लाल होऊ शकतात. पण डोळ्यात पाणी मारल्यावर ते निघून जातील आणि तुमचा त्रास कमी होईल. पण जास्तच जळजळ होत असेल, वेदना होत असतील किंवा दृष्टी धुसर झाली असेल तर लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवावे. अनेकांना असे वाटते की, कॉन्टॅक्ट लेन्स हा होळीमध्ये सुरक्षित पर्याय असतो. पण वस्तुस्थिती ही आहे की, कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यात जाणारा रंग शोषून घेतात आण तो रंग साकळतो. त्यामुळे डोळ्यांना जास्त इजा होऊ शकते. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचेच असतील तर डिस्पोझेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरावे आणि खेळून झाल्यावर ते टाकून द्यावे.”

डोळ्यांना इजा झाली तर?

१. तुमच्या डोळ्यात रंग गेला असेल तर सामान्य तापमान असलेल्या भरपूर पाण्याने डोळे धुवा.

२. डोळे लालसर झाले, डोळ्यातून पाणी येत असेल, वेदना होत असले, चुरचुरत असतील किंवा प्रकाशाप्रती संवेदनशील असतील तर डोळ्यांच्या डॉक्टरची भेट घ्या. डोळे चोळू नका.

३. डोळ्याला पाण्याचा फुगा लागला तर तुमचे डोळे स्वच्छ कापडाने झाका आणि लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi 2022 what to do if your eyes get injured while playing with colors learn from experts ttg