Holi 2023 : रंगांची मुक्त उधळण करत वातावरणात नवं चैतन्य निर्माण करणारा सण म्हणजे होळी. रंगांशिवाय होळी या सणाची कल्पनाच करणं शक्य नाही. भारतात आजही या सणाला तितकेच महत्त्व आहे. यंदा हा सण ८ मार्चला येत आहे. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशातील कानाकोपऱ्यात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. होली है भाई होली है, बुरा ना मानो होली है म्हणत एकमेकांना रंग लावत या सणाचा आनंद लुटला जातो. मात्र अनेकदा रंगांमुळे त्वचेच नुकसान होते. म्हणून आवड असूनही बरेच जण रंग खेळत नाहीत. यात सध्याच्या केमिकल मिश्रित रंगांमुळे त्वचेला इजा पोहचण्याची शक्यता फार असते. यात काहींना रंगांची अॅलर्जी असते. त्यामुळे होळी खेळल्यानंतर चेहरा निस्तेज दिसणे, चेहऱ्यावर मुरुमा येणं या सारख्या समस्या उद्धभवतात. पण तुम्हालाही त्वचेची काळजी घेत होळी खेळायची आहे, तर खाली दिलेल्या सोप्या टिप्स तुम्ही फॉलो करा.
होळी खेळण्यापूर्वी आणि होळीनंतर त्वचेची अशी घ्या काळजी:
चेहऱ्यावर सनस्क्रीनचा वापर करा.
होळीत रंग खेळण्याआधी चेहऱ्यावर सनब्लॉक अथवा सनस्क्रीन लावायला विसरु नका. यामुळे चेहऱ्यावर रंग असला तरी उन्हामुळे होणारी जळजळ कमी होईल, तसेच त्वचेच नुकसान होणार नाही. कारण सनस्क्रीन उन्हापासून त्वचेच संरक्षण करण्यास मदत करते.
त्वचेवर मॉइश्चरायझर लावा.
रंग खेळण्याआधी आणि खेळल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. कारण रंगांमुळे त्वचा अधिक निस्तेज होते. पण मॉइश्चरायजरमुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचेची इजा कमी होण्यास मदत होते.
नारळाच्या तेलाने मसाज करा.
होळीच्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर नारळाच्या तेलाने हलका मसाज करा. यात चेहऱ्यावर नाही पण मान, हात, पाय आणि कानाला तेलाने मसाज करु शकता. ऑयलिंग केल्यामुळे तुमच्या त्वचेचा आणि रंगांचा थेट संबंध येत नाही. यामुळे होळी खेळल्यानंतर जेव्हा रंग काढता तेव्हा हा रंग अगदी सहजपणे निघून जाण्यास मदत होते. तसेच रंगांमधील केमिकल्समुळे त्वचेची होणारी हानी कमी होते.
पेट्रोलियम जेली वापर करा.
रंग थेट त्वचेच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करु शकता. ही पेट्रोलियम जेली रंगामुळे त्वचेचं होणारं नुकसान रोखण्याच काम करते. यामुळे तुम्ही चेहरा वगळता, मान, हात, पाय आणि नखांवर पेट्रोलियम जेली लावू शकता.
ओठाचं संरक्षण करा.
होळीतील रंगामुळे अनेकदा ओठं फाटतात, खरखरीत होता. पण ओठांना लिपबाम लावून तुम्ही रंग खेळण्यासाठी बाहेर पडलात तर असं होणार नाही. लीप बाम ओठांना मुलायम ठेवण्याच काम करते. यामुळे होळीपूर्वी आणि होळीनंतरही ओठांवर लिपबाम वापरा.
त्वचा जोरजोरात घासून नका.
होळी खेळल्यानंतर त्वचेवरील रंग काढण्याची अनेकांना घाई असते. या घाईत जोर जोरात हात, पाय आणि चेहरा घासून रंग काढतो. पण यामुळे त्वचेचं मोठं नुकसान होते. यामुळे रंग काढण्याआधी त्वचा थंड पाण्याने आधी धुवा, त्यानंतर फोमिंग फेसवॉशने काही सेकंद हलका मसाज करा, यानंतर खोबरेल तेलात बुडवलेला एक कॉटन बॉल संपूर्ण चेहऱ्यावर हकल्या हाताने फिरवा. यानंतर पुन्हा फोमिंग फेसवॉशने हलका मसाज करत चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील रंग आरामात निघून जाईल.
रंग काढल्यानंतर त्वचेची कशी घ्या काळजी :
रंग स्वच्छ करून झाल्यानंतर त्वचेवर पुन्हा मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. मॉइश्चरायझर देखील जोरजोरात घासून लावू नका, अगदी हलक्या हाताने हे मॉइश्चरायझर चेहऱ्यावर आणि त्वचेच्या इतर भागांना लावा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहील, आणि रंगांमुळे होणारी जळजळ कमी होईल.
घरगुती फेस पॅक वापरा.
रंग खेळण्यानंतर त्वचा अधिक निस्तेज आणि काळी दिसू लागते. त्वचेची गेलेली चमक पुन्हा आणण्यासाठी तुम्ही घरगुती फेस पॅकचा वापर करू शकता. घरगुती फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही बेसन, हळद, मध, दही, चंदन पावडर, आणि ग्रीन टीचा वापर करु शकता.