वजन कमी करणे लठ्ठ लोकांपुढील एक मोठे आव्हान असते. स्त्रियांना लठ्ठपणाची समस्या असल्यास व्यायाम करणे गरजेचे आहे हे समजते. मात्र कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेणे, नोकरी, इतर जबाबदाऱ्या असे सगळे करताना मात्र त्यांची तारांबळ उडते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला व्यायाम मागे पडतो. मग वेळच मिळत नाही अशी सबब अगदी सहज दिली जाते. यामध्ये तथ्य असले तरीही व्यायाम हा उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतोच. आता पाहूयात अशी कोणती कामे आहेत ज्यामुळे तुमचे व्यायाम आणि काम असे दोन्ही हेतू साध्य होतात…घरातील अशी काही कामे आहेत जी केल्यामुळे नकळत तुम्ही बारीक होता आणि फिट राहण्यासही त्याचा चांगला फायदा होतो.
फरशी पुसणे
फरशी पुसणे हे अतिशय कष्टाचे काम आहे. यामध्ये स्क्वाट मारले जाऊन काही प्रमाणात क्रोलिंगही होते. त्यामुळे हा एकप्रकारचा व्यायमप्रकारच आहे. फरशी पुसताना कमरेची सतत हालचाल होत असल्याने शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. २० मिनिटे सलग फरशी पुसल्यास तुमच्या १५० कॅलरीज बर्न होतात.
कपडे धुणे
हल्ली कपडे हातानी धुणे ही पद्धत काहीशी मागे पडली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन बाजारात उपलब्ध झाल्याने कपडे हातानी धुण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. मात्र कपडे धुणे हा शरीरासाठी एक उत्तम व्यायामप्रकार आहे. कपडे धुताना हात, खांदे, व इतर शरीराचाही चांगला व्यायाम होतो आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
भांडी घासणे
भांडी घासणे हे काम अनेकांना आवडत नाही. तसेच नोकरी किंवा इतर व्याप असल्याने भांड्याला बाई लावली जाते. मात्र भांडी घासल्याने शरीराचा उत्तम व्यायाम होतो. यामुळे १२५ कॅलरीज बर्न होतात.
कणिक मळणे
कणिक मळणे हा हातांसाठी आणि बोटांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. यावेळी लागणारी ताकद आणि शरीराची हालचाल यामुळे एकावेळी ५० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे एकूणच घरातील ही कामे स्त्रियांनी स्वत: केल्यास त्यांचे वाढलेले वजन घटण्यास निश्चितच मदत होते.