ख्रिसमस आणि केक यांचे काही अनोखे नाते आहे. केक हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मनापासून आवडणारा पदार्थ आहे. अगदी लहानपणी मिळणारा खोबऱ्याचा गुलाबी केक असू दे किंवा अगदी मोठमोठ्या दुकानांमध्ये जास्त किंमतीला मिळणाऱ्या विविध पेस्ट्रीज असू दे. केक म्हणजे लहानग्यांचा तर वीक पॉईंटच. हल्ली बाजारात वेगवेगळ्या ब्रॅंडचे, रंगाचे, फ्लेवरचे, आकाराचे केक तर मिळतातच पण परदेशात आणि आता भारतातही घरात केक तयार करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढलेले दिसते. कधी ओव्हनमध्ये तर कधी थेट प्रेशर कुकरमध्ये हे केकचे प्रयोग केले जातात. आता केकसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू बाजारात अगदी सहज उपलब्ध होत असल्याने घरीही अगदी बाहेर मिळणाऱ्या केकसारखा किंवा कधी त्याहून चांगला केक करणाऱ्या स्त्रियाही आहेत. आता कोणताही पदार्थ करायचा, त्यातही केकसारखा, तर काही विशेष गोष्टी लक्षात घ्यायलाच हव्यात. पाहूयात घरच्याघरी केक करताना लक्षात घ्याव्यात अशा काही खास टिप्स…

१. केकमध्ये अंडे घालत असू तर ते कितपत फेटायचे असा प्रश्न अनेक महिलांना असतो. तर अंडे हलके होईपर्यंत म्हणजे पिवळा आणि पांढरा भाग योग्य पद्धतीने एकत्र होईपर्यंत फेटावे. यामुळे केक हलका होण्यास मदत होते.

२. अंडे वापरत नसलेल्यांचा केकही हलका व्हावा यासाठी काही सोपे उपाय आहेत. अंडे न खाणाऱ्यांनी केक तयार करताना त्यात थोडा सोडा घालावा. याशिवाय व्हिनेगर घातल्यास केक स्पाँजी होण्यास मदत होते. व्हिनेगर घरात उपलब्ध नसेल तर लिंबू पिळणे हाही एक चांगला उपाय असतो. याशिवाय लिंबूही नसेल तर केळे थोड्या प्रमाणात स्मॅश करुन घातल्यास त्यामुळेही केक हलका होण्यास मदत होते.

३. केकमध्ये एखादा स्निग्ध पदार्थ घातल्याने तो भांड्यापासून सुटण्यास मदत होते आणि चिकटत नाही. यामध्ये लोणी, बटर, तूप यापैकी काहीही घातले तरीही चालते. फक्त याचा केकला वास लागणार नाही याची काळजी घ्यावी. लोणी घालत असताना त्यामध्ये ताकाचा अंश अजिबात नसेल याची विशेष काळजी घ्यायला हवी. याशिवाय रिफाईंड तेल हाही केकमध्ये घालण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

४. केकच्या मिश्रणात नेहमी चवीला मीठ घालायला विसरु नका. मीठामुळे केकच्या बॅटरमध्ये गुठळ्या होत नाहीत. जर गुठळ्या झाल्या नाहीत तरच तुमचा केक मऊ होतो. त्यामुळे केक हा गोड पदार्थ असला तरीही त्यामध्ये चवीसाठी मीठ हा सर्वात उपयुक्त पदार्थ आहे. मात्र याचे प्रमाण अतिशय कमी असायला हवे.

५. यामध्येही पर्सनल टच द्यायचा असेल तर तुम्ही काहीतरी वेगळे प्रयोग नक्कीच करु शकता. साखरेऐवजी ब्राऊन शुगर, मैद्याऐवजी गव्हाचे पीठ, नाचणीचे पीठ , अंड्याऐवजी दही, केळी असे पौष्टिक पर्याय तुम्ही वापरु शकता.ख्रिसमस केक सहसा भरपूर फळे आणि सुकामेवा घालून बनवला जातो. त्यामुळे संत्री, स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांचा वापर केकसाठी करता येतो.

Story img Loader