आजकाल तरुणांमध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीसारखी दाढी ठेवण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण, अनेक तरुणांची दाढी कमी वयातच पांढरी होत आहे. उतारवयात दाढी-मिशीचे केस पांढरे होणे एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, लहान वयात केस पांढरे होत असल्याने खूप काळजी वाटते. यावेळी पांढरे केस काळे करण्यासाठी लोक वेगवेगळे डाय वापरतात. तरीही पांढऱ्या केसांपासून सुटका मिळत नाही. मग दाढी आणि मिशांचे निवडक पांढरे केस लोक कात्रीने कापतात. पण, जास्त पांढरे केस असले तर ते कापून काही उपयोग होत नाही. अशा वेळी बाजारातील महागड्या उत्पादनांवर पैसा खर्च न करता, तुम्ही काही घरगुती उपाय करून पांढरे केस काळे करू शकता. चला जाणून घेऊ या ते उपाय ….
खोबरेल तेल व कढीपत्ता
खोबरेल तेल व कढीपत्ता वापरून तुम्ही दाढी आणि मिशांचे केस काळे करू शकता. त्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल उकळून घ्या आणि उकळी आल्यानंतर त्यात कढीपत्ता घाला. आता दोन्ही मंद आचेवर थोडा वेळ उकळू द्या. नंतर हे तेल थंड होऊ द्या. आता ते तुमच्या दाढी आणि मिशांवर लावा आणि ५-१० मिनिटे तसेच ठेवा. या तेलाचा रोज वापर करा.
कांद्याचा रस
केसांच्या वाढीबरोबर पांढरे केस कमी करण्यासाठी कांद्याचा रस खूप प्रभावी आहे. त्यासाठी कांदा बारीक करून त्याचा रस काढा आणि रोज अंघोळ करण्यापूर्वी दाढी-मिशीवर लावा आणि थोडा वेळ ठेवा. कांद्याचा रस एकाच वेळी अनेक समस्या दूर करील. केस काळे होतील आणि चमकही येऊ शकते,
आवळा आणि खोबरेल तेल
आवळा आणि खोबरेल तेलाच्या वापरानेही दाढी-मिशीचे केसही दीर्घकाळ काळे करण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी खोबरेल तेलात आवळ्याची पावडर टाकून उकळवा. आवळ्याची पावडर पूर्णपणे मिसळून खोबरेल तेल काळे होईपर्यंत उकळवा. हे तेल रोज सकाळी दाढी-मिशीला लावा.