‘‘डॉक्टर, डॉक्टर, इकडे जरा बघा हो.. माझा हा हात वर जात नाही. मागे वळवता येत नाही. खूप वेदना होत आहेत; कसेही करून हा माझा त्रास कमी करा.’’ या तोंडी तक्रारींबरोबर संबंधित रुग्ण आपले एक्सरे रिपोर्ट दाखवतो. त्यांत मानेच्या व पाठीच्या कांही मणक्यांत दोष असतो. मानेचे व पाठीचे वरचे पाच सहा मणके दबलेले चिकटलेले, एकावर एक चढलेले किंवा त्यांतील अंतर खूप कमी झालेले असते. कांही वेळा हाताच्या बोटांना मुंग्या येत असतात. अशा वेळेस आधुनिक वैद्यक तज्ज्ञ वेदनाशामक गोळ्या घ्यावयाचा सल्ला देतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण रोग पूर्णपणे बरा होत नाही. या तक्रारीकरिता आयुर्वेदाची अनेक औषधे, गुग्गुळ कल्प, अभ्यंग तेले, लेप गोळ्या बराच गुण देतात. उदा. सिंहनाद, लाक्षादि, गोक्षुरादि, त्रिफळा गुग्गुळ, वातगजांकुश इ. इ.
अशा तक्रारींनी पिडलेल्या रुग्णाने तत्काळ कोणतेही तेल म्हणजे गोडे तेल, तिळाचे तेल, एरंडेल चार भाग व गवती चहाचा अर्क एकत्र मिसळून सकाळी स्नानाचे अगोदर, रात्रौ झोपताना; संबंधित हात, खांदा, मान यांना हलक्या हातांने जिरवावे. संपूर्ण हाताला खालून वर, खांदा व मान यांना गोल अशा पद्धतीने तेल चोळावे. आपल्या जवळ आंबेहळद, रक्तरोडा साल, तुरटी असल्यास ते सहाणेवर उगाळून नंतर गरम करून दाट लेप लावावा. एअर कंडिशनर, पंख्याचे थेट वारे, थंड पेये, आईस्क्रीम, लस्सी, बर्फ, लोणची पापड, खूप खारट, आंबट व थंड पदार्थ टाळावे. शक्यतो कठीण उबदार अंथरूण ब्लँकेट, गोधडी वापरावी. उशी, गादी टाळावी. जादा वजन उचलणे, एका हाताने पाण्याने भरलेली बादली उचलणे, तसेच खूप शारीरिक कष्टाची कामे टाळावी. कृश व्यक्तींनी खूप खूप लंघन न करिता माफक प्रमाणात उडीद, डिंक किंवा हाळीवाचे लाडू खावे. नेहमी शरीरातील रक्ताचे प्रमाणावर लक्ष असावे. कोणतेही शारीरिक काम घाईगर्दीने, हिसक्याने करू नये. बैठे काम किंवा खूप लिखाण करणाऱ्यांनी सतत दीर्घकाळ तेच काम करणे हा गुन्हा आहे असे समजावे. फ्रोजन शोल्डर या विकारात नुसती औषधे घेणे वा तेले, लेप लावणे याबरोबरच खांदा, मान यांना अजिबात न दुखवता; खांदा मोकळा होईल, हात सहजपणे मागे पुढे वा वर होईल असे ‘हलके व्यायाम’ करावेत. आपण सर्वानी आपापल्या शाळेत, सायंकाळी पीटीचे, शारीरिक शिक्षणाचे व्यायामाचे प्रकार केले असतील. फ्रोजन शोल्डर ग्रस्त रुग्णांनी या व्यायामांना प्राधान्य देऊन या रोगमुक्तीचा सहजानंद अवश्य घ्यावा.
संयमसे स्वास्थ, शुभं भवतु!
वाचा- आरोग्याची गुरुकिल्ली
अस्थिविकार
समस्त मानवाला पिडणाऱ्या विकारांत अस्थि किंवा हाडांच्या विकारांची संख्या खूप आहे. मेंदूची कवटी, नाकातील हाडे, कानांतील तीन हाडांची साखळी, मान, पाठ व कंबर येथील अनेक मणक्यांचे विकार, खांद्याची हाडे; दांत, हिरडय़ांचे आजार, गुडघे, टाचेची हाडे अशा विविध विकारांत सब घोडे बारा टक्के असे औषधोपचार कोणत्याच वैद्यकशास्त्रात नाहीत. दिवसेंदिवस मान, पाठ, कंबर, गुडघे व टाचेच्या हाडांच्या विकारांची वाढती संख्या ही मोठी चिंतेची बाब होऊन बसली आहे. या पाच विकारांकरिता विविध गुग्गुळकल्प मोठेच योगदान देत असतात. या हाडांच्या विकारांचा विचार करताना हाडांची झीज, कटकट आवाज, आराम केल्यास बरे वाटणे, रक्ताचे, दैनंदिन कामाचे स्वरूप; जेवण घरचे का बाहेरचे; लोणची, पापड सारखे अधिक मीठ असणारे पदार्थ; कोल्ड्रिंक, फ्रिजचे पाणी व सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे रुग्णाचे वय याचा विचार प्रामुख्याने करावा लागतो.
हाडांच्या विकारात आवाज येणे ही तक्रार जास्त असली तर कटाक्षाने मीठ टाळावे. खूप जिने चढउतार, दगदग, जास्त वजन उचलणे टाळावे. कृश रुग्णांनी ताजे घरगुती लोणी किंवा तुपाचा अवश्य वापर करावा. जेवणात उडीद, मूग, ओले खोबरे, शेंगदाणे, तीळ यांचा वापर असावा. धूम्रपान, तपकीर, तंबाखू, मद्यपान अशी व्यसने अवश्य टाळावीत. कांही अस्थि विकारग्रस्त मंडळी डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे कॅल्शिअमच्या खूप गोळ्या कायम घेत असतात. पण त्याचा रुग्णांना विशेष लाभ होत नाही. मात्र त्या गोळ्या बनवणाऱ्या कंपनीला खूप आर्थिक लाभ होत असतो. दूध, पालेभाज्या, मोड असलेली कडधान्ये; ताडगोळे, सफरचंद, डाळिंब, पपई, खरबूज अशी फळे आलटून-पालटून खावीत. जागरण व रात्रौ उशिरा जेवण टाळावे. बाह्येपचारार्थ खूप प्रकारची तेले वापरात असल्यास, संबंधित अवयवांत आपण लावत असलेले तेल जिरले पाहिजे याकडे लक्ष असावे. आपल्या घरात रोजच्या वापरात असणारे गोडे तेल थोडे कोमट करून त्यात थोडे मीठ मिसळून; दुखऱ्या किंवा सूज असणाऱ्या अवयवांमध्ये जरूर जिरवावे. कानाच्या व मेंदूच्या अस्थि संबंधित विकारांत, शरीरातील लोहाच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे लागते. अस्थि विकारांत थोडे दूरचे नियोजन करावे लागते. कोणताही ‘शॉर्ट कट’ उपयोगी पडत नाही हे लक्षात असावे.
काही अस्थि विकारग्रस्त मंडळी डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे कॅल्शिअमच्या खूप गोळ्या कायम घेत असतात. पण त्याचा रुग्णांपेक्षा त्या गोळ्या बनवणाऱ्या कंपनीला खूप आर्थिक लाभ होतो.
सौजन्य : लोकप्रभा