Hair Care Benefits of Coconut Oil: आजकाल केस अकाली पांढरे होणे, हा एक चिंतेचा विषय बनला आहे. एकेकाळी केस पांढरे होणे हे वयाशी निगडित मानले जात होते. परंतु, आजकाल ही एक सामान्य समस्या आहे. आता लहान वयातच लोकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. लहान वयातच मुलांचे केसही पांढरे होतात हे आपण पाहतो. अलीकडच्या काळात जीवनशैलीतील बदल, आहारातील बदल, रसायनांचा वापर यांसारख्या कारणांमुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसतात. बाजारात अनेक उत्पादने मिळतात, ज्यामुळे केस काळे करता येतात. मात्र, त्यातील रसायनांमुळे केस खराब होतात आणि निस्तेज होतात. त्याशिवाय केसगळती आणि केस तुटणे यांसारख्या समस्याही निर्माण होतात. तेव्हा पांढरे झालेले केस पुन्हा मुळापासून काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरतात. आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या केसांच्या समस्येवर उपाय काय करावा, याविषयीची माहिती देणार आहोत.

केसांना तेल लावणे हे केसांच्या वाढीसाठी, केस जास्त गळू नयेत म्हणून आणि केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळावे यासाठी अतिशय उपयुक्त असते. केसांची उत्तम वाढ व्हावी आणि केस दिर्घकाळ चांगले राहावेत यासाठी पारंपरिक खोबरेल तेल सर्वात चांगले असते. खोबरेल तेलात व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने केसांच्या वाढीसाठी आणि चांगले पोषण होण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम आहे.

खोबरेल तेलात मिसळा ‘या’ दोन गोष्टी

खोबरेल तेल आणि आवळा

खोबरेल तेल आणि आवळ्यामध्ये अनेक घटक आढळतात, जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. या मिश्रणाने तुम्ही तुमचे केस सहजपणे काळे करू शकता. हे मिश्रण तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त ३ चमचे खोबरेल तेल घ्यावे लागेल आणि त्यात २ चमचे आवळा पावडर मिसळावी लागेल. आवळा पावडर व्यवस्थित विरघळेपर्यंत या भांड्यात तेल गरम करा.

त्यानंतर हे तेल व्यवस्थित थंड होण्यासाठी बाजूला ठेवा आणि नंतर केसांना नीट मसाज करा. आवळ्यामध्ये असलेले घटक तुमच्या डोक्यावरील केस काळे होण्यास खूप मदत करतात. त्यामुळे केसांची मुळेही मजबूत होतात.

खोबरेल तेल आणि मेंदीची पाने

जर तुम्ही केसांना मेंदी लावली, तर ती तुमच्या केसांना वरूनच रंग देते. केसांचा रंग मुळापासून बदलायचा असेल, तर मेंदी तेल वापरा. ते तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त ३-४ चमचे खोबरेल तेल उकळवावे लागेल आणि त्यात मेंदीच्या पानांचा गुच्छ घालावा लागेल.

जेव्हा या तेलाचा रंग तपकिरी होऊ लागतो तेव्हा गॅस बंद करा आणि गॅसवरून तेलाचे भांडे बाजूला काढून घ्या. हे उकळलेले तेल थंड करून केसांच्या मुळांवर लावा. ४०-५० मिनिटे ते केसांवर ठेवा आणि काही वेळाने त्याचा परिणाम पाहा. हे तेल तुमचे केस आतून काळे करण्यास उपयुक्त आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून, ‘लोकसत्ता’ त्याची पुष्टी करीत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)