घसा बसणे हा एक सामान्य आणि सहसा दुर्लक्षित केला जाणारा त्रास आहे. हवामानात बदल झाला की, अनेकांना घसा बसण्याची समस्या जाणवते. यावेळी घसा वारंवार कोरडा पडणे, जळजळ होणे आणि आवाज स्पष्ट न फुटणे अशी समस्या जाणवते. विशेषत: हिवाळ्यात प्रदूषण आणि थंड हवामानामुळे अनेकांना या त्रासाचा सामना करावा लागतो.
अशा परिस्थितीत जोरजोरात बोलल्याने, अति थंड किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही घसा बसू शकतो. पण, हा एक सामान्य आजार असल्याने तो एक-दोन आठवड्यात बरा होतो. पण, या काळात आपला आवाज स्पष्ट येत नसल्याने समोरच्याला आपण काय बोलतोय हे नीट समजत नाही. अशावेळी आपण आणखी जोरात बोलण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे घसा आणखी दुखू लागतो. अशावेळी तुम्ही खालील चार घरगुती उपाय करून पाहिल्यास घसा मोकळा होण्यास मदत होईल.
काळी मिरी
काळी मिरीच्या मदतीने तुम्ही घसा खवखवण्यापासून आराम मिळवू शकता. यासाठी पाच ते सहा काळी मिरी एक चमचा तुपात घालून नीट शिजवा, यानंतर त्याची बारीक पेस्ट करा. तुम्ही ही पेस्ट दिवसातून दोनदा सेवन करू शकता. यामुळे घशाला आराम मिळेल आणि तुमचा आवाजही लवकर बरा होईल.
लसूण
घसा बसल्यामुळे बोलताना येणारा कर्कश आवाज दूर करण्यासाठी लसणाचा वापर करू शकता. कारण लसणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे घशातील बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन्स दूर करण्यास मदत करतात. यासाठी लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करा, त्यानंतर मधात मिसळून खा किंवा तुम्ही त्या अशाच खाऊ शकता. यानंतर थोडे कोमट पाणी प्या. असे केल्याने तुमच्या घशाला थोडा आराम मिळेल आणि आवाजही चांगला होईल.
दालचिनी
घशातून कर्कश आवाज येत असतानाही तुम्ही सतत बोलत राहिल्यास घशाला सूज येते. अशावेळी तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. वेगवेगळ्या प्रकारे ही दालचिनी वापरता येते. तुम्ही चहामध्ये दालचिनी वापरू शकता किंवा गरम पाण्यात तिची बारीक पेस्ट करूनही पिऊ शकता.
मीठ
मीठ हे अँटिसेप्टिक असल्याने गळ्यातील इन्फेक्शन कमी करायला मदत करते. यामुळे घसा बसल्यास तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या करा, ज्यामुळे घशाला आराम मिळून आवाज मोकळा होण्यास मदत होते.