त्वचा ही आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग असतो. या त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये तर त्वचेच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडून त्याची आग होते. तर उन्हाच्या तडाख्यामुळे त्वचा टॅन होऊन काळी पडते. त्वचा काळी पडण्याची अनेक कारणे आहेत, नेमके कारण शोधून त्यावर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. कधी बाजारातील सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे तर कधी पार्लरमध्ये जाऊन यावर उपाययोजना शोधल्या जातात. मात्र काही सोप्या घरगुती उपायांनीही काळवंडलेली त्वचा पूर्वीसारखी होण्यास मदत होते. पाहूयात त्वचा नितळ आणि मुलायम करण्याचे असेच काही सोपे उपाय…
१. कच्चे दूध आणि लिंबू एकत्र करुन ते काळवंडलेल्या त्वचेवर लावून ठेवल्यास त्याचा त्वचेचा काळेपणा निघून जाण्यास मदत होते. आठवड्यातून तीन वेळा हे केल्यास त्याचा फायदा होतो.
२. संत्र्याच्या साली वाळवून त्याची पावडर करुन ठेवावी. संत्र्याप्रमाणेच संत्र्याच्या सालीतही बरेच गुणधर्म असतात. या सालींच्या पावडरमध्ये दही घालून ते मिश्रण लावून ठेवल्यास त्वचा उजळण्यास मदत होते.
३. लिंबू आणि साखर यांचे मिश्रणही काळवंडलेल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. लिंबाच्या रसात साखर योग्य पद्धतीने विरघळून ते मिश्रण हात आणि पाय तसेच हाताचे कोपर, काळवंडलेली मान या ठिकाणी लावावे. चिकट असल्याने आपल्याला काही वेळ नकोसे होते पण थोडा वेळ ठेवून धुवून टाकावे. हे नियमित लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
४. चंदन पावडर हे त्वचेसाठी रामबाण औषध आहे. पूर्वापार चालत आलेल्या या उपायाचा आजही तितकाच चांगला उपयोग होतो. चंदन पावडरमध्ये लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घालून ते मिश्रण काळवंडलेल्या भागावर लावावे. चेहरा, हात, पाय अशा सगळ्या ठिकाणी १५ मिनिटांसाठी लावून ठेवल्यास त्वचेचा काळेपणा निघण्यास मदत होते.
५. बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये. अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता.
६. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे विविध सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोरफडीचा वापर केला जातो. काळवंडलेल्या त्वचेवर कोरफडीची जेल लावल्यास त्याचा त्वचा उजळण्यास निश्चितच फायदा होतो.