Home Remedies for Ants: उन्हाळा सुरु झाला की, घरात किडे, मुंग्यांचा वावर वाढतो. एखादा गोड पदार्थ खाताना जमिनीवर पडला तर त्याठिकाणी काही वेळानंतर लगेच मुंग्या आलेल्या दिसतात. अनेकदा मुंग्या साखरेच्या डब्यात शिरतात तर कधी गोड पदार्थांभोवती असतात. स्वयंपाकघरातील सिंकच्या आजाबाजूला, ओट्यावर या मुंग्यांची रांग लागलेली दिसते. मुंग्या स्वयंपाकघरातील अन्न आणि स्वच्छतेसाठी मोठा धोका ठरतात. काहीवेळी या मुंग्या अगदी बारीक असतात तर काहीवेळा मोठ्या लाल चावणाऱ्या मुंग्या असतात. घरभर या मुंग्यांचा उच्छाद पाहिला की नकोसे वाटते. लाल मुंग्या कायमच घरात येऊ लागल्या तर अनेकवेळा घरातील लहान मुलांसह मोठ्यांनाही चावतात. मुंग्यांना दूर पळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. हे उपाय केल्याने घरातील मुंग्या कायमच्या पळून जातील.

घरात मुंग्या झाल्यात, करा ‘हे’ घरगुती उपाय

१. मीठ

मुंग्यांना घरातून पळवण्यासाठी मीठ हा चांगला उपाय आहे. मिठाचं पाणी तयार करून ते स्प्रे सारखंही वापरू शकता. जिथे जिथे मुंग्यांचा वावर दिसतोय तिथे तुम्ही मीठ शिंपडा. एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंग्या दिसल्यास तुम्ही तिथे काहिसं मीठ टाकल्यास त्या मरुन जातील.

२. पुदिना

उन्हाळा असो किंवा पावसाळा पुदिन्याचा वापर सर्वांच्याच घरी केला जातो. पुदिन्याच्या पानांचा वापर करून तुम्ही मुंग्यांना दूर पळवू शकता. खरं तर, मुंग्या पुदिन्याचा तीव्र वास सहन करू शकत नाहीत, ज्यामुळे त्या लगेच त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागतात. यासाठी पुदिन्याचे पाणी उकळून याचे थेंब इसेंशियल ऑईलचे थेंब आणि १ कप पाण्यात मिसळून मुंग्यांवर टाकून घ्या. यामुळे मुंग्यांपासून सुटका मिळेल.

३. दालचिनी

आपल्या घरातील स्वयंपाक घरात गरम मसाल्यात दालचिनी पदार्थ वापरला जातो. दालचिनीमुळे तुमच्या घरातील सर्व मुंग्या एका मिनिटात गायब होऊ शकतात. दालचिनीचा वास मुंग्यांना आवडत नाही, त्यामुळे मुंग्याना घरात येण्यापासून रोखायला मदत होते.

४. काळी मिरी

मुंग्यांना काळी मिरी अजिबात आवडत नाही. काळीमिरीच्या वासाने त्या पळ काढतात. त्यामुळेच मुंग्याना पळवण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी त्या येऊ नये यासाठी काळ्यामिरीची पुड त्या ठिकाणी टाकल्यास मुंग्या गायब होतील. तुम्ही पाण्यात काळी मिरी पावडर मिसळून फवारणी करू शकता. ज्यामुळे मुंग्या लवकर पळतील आणि पुन्हा येणार नाही.

५. लिंबू

लिंबाचा वास आणि त्याची चव ही मुंग्याना पळवण्यासाठी मदत करू शकते. अशा परिस्थितीत, मुंग्या घरात येण्यापासून रोखण्यासाठी, दररोज पुसताना जमिनीवर शिंपडा. मुंग्या लिंबाच्या सुगंधाने दूर पळू लागतील. लिंबाचा रसही तुम्ही मुंग्यांवर शिंपडू शकता. काही आंबट पदार्थ मुंग्याना अजिबात आवडत नाहीत.