How to Get Rid of Pigeons: बहुमजली इमारतीच्या बाल्कनी, तसेच खिडकीवर अनेकदा कबुतरे बसलेली दिसून येतात. तिथे ती उच्छाद मांडतात. अनेक लोकांना कबुतरांचा खूप त्रास होतो. कबुतरं बाल्कनीमध्ये येऊन घाण करतात. त्यांची विष्ठा आणि पिसे यांमुळे बाल्कनी तसेच खिडकी खराब होऊन जाते. इतकेच नव्हे, तर ती तिथेच घरटं बनवून अंडीही घालतात. या कबुतरांमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. कबुतरांनी केलेल्या या घाणीमुळे तसेच त्यांच्या पंखांमुळे श्वसनाशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. कबुतरांपासून सामान्यांना होणारा संसर्ग वाढलाय. त्यामुळे आपल्या टेरेस आणि बाल्कनीतून या कबुतरांचं अतिक्रमण लवकरात लवकर हटविणं गरजेचं झालं आहे. अशा परिस्थितीत कबुतरांना बाल्कनीपासून दूर ठेवायचे असेल, तर त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सोपे उपाय घेऊन आलो आहोत. या उपायामुळे कबुतरं तुमच्या खिडकीजवळही फिरकणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊ…
कबुतरं बाल्कनी, तसेच खिडकीमध्ये येऊन उच्छाद मांडतात? तर खालील सोपे उपाय करा
१. कबुतरांना तीव्र वास अजिबात आवडत नाही. मग ती अशा ठिकाणापासून दूर राहणे पसंत करतात. त्यासाठी तुम्ही पाण्यात पांढरा व्हिनेगर, लसूण किंवा कांद्याचा रस मिसळा आणि बाल्कनीमध्ये त्याची फवारणी करा. या पद्धतीनं कबुतरं तुमच्या बाल्कनीत येणार नाहीत.
२. कबुतरांना घाबरवण्यासाठी तुमच्या बाल्कनीमध्ये बाज किंवा गरुड यांसारख्या मोठ्या पक्ष्यांची बनावट मॉडेल्स लटकवा. कबुतरं आणि इतर लहान पक्षी त्यामुळे घाबरतील आणि बाल्कनीत येणं बंद करतील.
३. पक्ष्यांना चमकदार वस्तू अजिबात आवडत नाहीत. कारण- त्यातून सूर्यप्रकाश परिवर्तित होऊन त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाल्कनीतून कबुतरांना हाकलण्यासाठी टाकाऊ सीडी वापरता येऊ शकते. सीडीची चमक कबुतरांना दूर ठेवते. जेव्हा सीडी चमकते तेव्हा कबुतरं घाबरतात आणि उडून जातात.
४. कबुतरांना बाल्कनीपासून दूर ठेवण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे काळी मिरी आणि लाल मिरचीचा स्प्रे. तुम्ही दोन्ही प्रकारची पावडर पाण्यात वेगवेगळी मिसळून फवारणी करू शकता. या फवारणीच्या मदतीनं तुम्ही कबुतरांना तुमच्या बाल्कनीपासून दूर ठेवू शकता.
५. एका भांड्यात दोन चमचे व्हिनेगर आणि थोडा बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये टाका. हा स्प्रे बाल्कनीमध्ये फवारा. त्याच्या वासाने कबुतरं बाल्कनीतून पळून जातील.
६. कबुतरांना कॅक्टस म्हणजेच निवडुंगाचे झाड आणि त्याचे काटे आवडत नाहीत. तेव्हा बाल्कनीत निवडुंगाचे रोप असल्यास ती बाल्कनीपासून दूर राहतात.