वयानुसार शरीरात अनेक बदल होतात, जे चेहऱ्यावरही दिसून येतात. पिंपल्स, मुरुमांमुळे चेहरा खूप खराब दिसतो. यात चेहऱ्यावर लहान केस येतात. हे लहान केस ओठांच्या वर जास्त दिसून येतात. यामुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अनेक मुली वॅक्सिंग किंवा रेझरचा वापर करतात. वॅक्सिंग करताना चेहऱ्यावर खूप वेदना होतात. तर रेझरने केस पुन्हा पटकन वाढतात. पण रेझर आणि वॅक्सिंग न करता तुम्ही चेहऱ्यावरील नको असलेले केस काढू शकता. ‘प्रियल ब्युटी टिप्स’ नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर यासाठी काही नैसर्गिक फेस पॅक सांगण्यात आले आहेत, ज्याच्या वापराने तुम्ही चेहऱ्यावरील नको असलेले केस सहज काढू शकता. चला जाणून घेऊ या हे फेस पॅक बनवून चेहऱ्यावर कसे अप्लाय करायचे….
‘प्रियल ब्युटी टिप्स’ने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, हेअर रिमूव्हल पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळून घ्या. त्यात एक चमचा साखर आणि अर्धा चमचा हळद घालून पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. आता हे पाणी एका वेगळ्या भांड्यात काढून त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. तांदळाचे पीठ घातल्यानंतर त्याची पेस्ट नीट मिक्स करून चेहऱ्यावर लावा.
ही पेस्ट चेहऱ्यावर कोरडी होईपर्यंत ठेवा. त्यानंतर पाण्याच्या मदतीने हलक्या हातांनी चेहरा धुवा. आता तुमचा चेहरा तजेलदार दिसलेच, शिवाय नको असलेल्या केसांपासून सुटका मिळेल.
‘या’ ट्रिकचा करू शकता वापर
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी इतर अनेक घरगुती उपायांचा वापर केला जाऊ शकतो. जसे एक चमचा मधात दोन चमचे साखर मिसळून एक चमचा पाण्यात मिसळा. हे मिश्रण गरम करा आणि नको असलेल्या केसांवर कॉटन स्ट्रिप लावून थंड करा, यानंतर केस ज्या दिशेने वाढतात, त्याच्या उलट्या दिशेने स्ट्रिप खेचा. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी वॅक्स करू शकता. पण हे मिश्रण जास्त गरम चेहऱ्यावर लावू नका.
यात आणखी एक फेस पॅकची पद्धत आहे. यासाठी तुम्हाला पपई आणि हळद एकत्र करून पेस्ट बनवावी लागेल. पपईचे दोन ते तीन तुकडे घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद मिसळून पेस्ट बनवा आणि १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर धुवा. यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस कमी होतील.