होमिओपॅथी ही उपचारपद्धती कुठल्याही वैद्यकीय स्थितीवर उपचार करण्यासाठी परिणामकारक नसल्याचा निष्कर्ष ऑस्ट्रेलियातील एका वैद्यकीय संशोधन संस्थेने होमिओपॅथीवरील २२५ शोधनिबंधांच्या अभ्यासाअंती काढला आहे.
जे उपचार सुरक्षित आणि परिणामकारक आहेत ते नाकारून किंवा त्यासाठी विलंब करून जे लोक होमिओपॅथीचा अंगीकार करतात, ते त्यांचे आरोग्य धोक्यात घालतात, असा इशारा नॅशनल हेल्थ अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च कौन्सिलने (एनएचएमआरसी) दिला आहे. होमिओपॅथीच्या परिणामकारकतेबाबत मिळालेल्या पुराव्याचे मूल्यांकन केल्यानंतर, आरोग्याच्या एखाद्या स्थितीवर उपचार करण्यासाठी होमिओपॅथी परिणामकारक पुरावा नसल्याचा आमचा निष्कर्ष आहे, असे ‘गार्डियन’ने प्रकाशित केलेल्या या अहवालात म्हटले आहे.
आजाराचे कारण ठरणारे पदार्थ अगदी थोडय़ा प्रमाणात दिल्यास त्या आजाराच्या रुग्णांवर उपचार करता येऊ शकतो, असे होमिओपॅथ मानतात. हे पदार्थ पाणी किंवा अल्कोहोलमध्ये विरल केल्यानंतर जे मिश्रण तयार होते, त्यात मूळ पदार्थाची ‘स्मृती’ कायम असते आणि तिच्यामुळे शरीरात ‘बरे होण्याची प्रक्रिया’ (हीलिंग रिस्पॉन्स) जागृत होते, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु अनेक प्रकारे अभ्यास केल्यानंतर हे दावे सर्वत्र अमान्य करण्यात आल्याचे संस्थेने म्हटले आहे.
काही अभ्यासांच्या अहवालामध्ये होमिओपॅथी परिणामकारक असल्याचे म्हटले असले, तरी या अभ्यासांचा दर्जा निकृष्ट होता आणि त्यांच्यात गंभीर त्रुटी होत्या. शिवाय, साध्या साखरेच्या गोळीचा जेवढा परिणाम होतो, त्यापेक्षा होमिओपॅथीचा अधिक चांगला फायदा होतो या कल्पनेला दुजोरा देण्याइतके पुरेसे लोक त्यात सहभागी झाले नव्हते, असेही अहवालात नमूद केले आहे.

Story img Loader