होमिओपॅथी ही अत्यंत लोकप्रिय उपचारपद्धती म्हणून ओळखली जात असून सध्या जगभरात ५० कोटी नागरिक या उपचार पद्धतीचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अॅलोपॅथीनंतर या पॅथीचा वापर जगात सर्वत्र होत असल्याचा अभिप्राय जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.
होमिओपॅथीचे संस्थापक दिवं. डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभरात १० एप्रिल हा दिवस होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील ८५ देशांमध्ये होमिओपॅथीचा लाभ घेतला असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे. जागतिक स्तरावरील होमिओपॅथी बाजारपेठेचे मूल्य २०१७ पर्यंत ५२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. जागतिक स्तरावरील होमिओपॅथी बाजारपेठेमध्ये फ्रान्सचा वाटा सर्वाधिक ३० कोटी युरो असून त्यापाठोपाठ २० कोटी युरोसह जर्मनीचा क्रमांक लागतो.
इंग्लंडमध्ये होमिओपॅथी रुग्णालये ही त्यांच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतील महत्त्वाचा भाग आहे. भारतातील होमिओपॅथी बाजारपेठेचे मूल्य २०१७ पर्यंत ५ हजार ८७३ कोटी रुपयांचा पल्ला ओलांडेल आणि या बाजारपेठेमध्ये २५ ते ३० टक्के दराने वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. होमिओपॅथीचा वापर करणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पारंपारिक अॅलोपॅथिक फार्मास्युटीकल्स उद्योगातील वाढ १३ ते १५ टक्के इतकाच वर्तवण्यात आला आहे. होमिओपॅथी ही अधिक व्यक्तिगत अशा स्वरूपाची उपचारपद्धती असल्याने आणि यात डॉक्टर व रुग्ण यांच्यात अधिक प्रमाणात सुसंवाद होत असल्याने १५० दशलक्षहून अधिक लोक होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वापर करतात. अॅलोपॅथिक उपचार पद्धतीच्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या साईड इफेक्टसमुळे होमिओपॅथी ही अत्यंत लोकप्रिय उपचारपद्धती असल्याचे ८० टक्के लोकांना वाटते.
भारतात ३ लाखांहून अधिक अर्हताप्राप्त होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स आहेत. तसेच देशात ७ हजार ५०० होमिओपॅथीचे शासकीय रुग्णालये असून या रुग्णालयात होमिओपॅथीद्वारेच उपचार केले जातात. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या १८० शैक्षणिक संस्थेकडून होमिओपॅथीचे शिक्षण दिले जाते. होमिओपॅथीची औषधे ही अत्यंत सुरक्षित असून त्यामुळे कुठलेही साईड इफेक्टस होत नाहीत. विशेष म्हणजे या औषधांचे परिणाम हे दीर्घकाळ टिकणारे आहेत. या पॅथीतील औषधे घेण्यास सुलभ असतात.
होमिओपॅथी ही अत्यंत लोकप्रिय उपचारपद्धती
होमिओपॅथी ही अत्यंत लोकप्रिय उपचारपद्धती म्हणून ओळखली जात असून सध्या जगभरात ५० कोटी नागरिक या उपचार पद्धतीचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा
First published on: 11-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homeopathy is the most popular treatment