भिन्नलिंगी संबंध ठेवणाऱ्यांच्या तुलनेत समलिंगी (एलजीबी) संबंध ठेवणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये स्वत:ला इजा करून घेण्याची किंवा आत्महत्येची प्रवृत्ती अधिक असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
आत्मप्रतिष्ठा खालावल्याने ते जीवाचे बरेवाईट करण्याचा विचार करतात असे इंग्लंडमधील मँचेस्टर अँड लिड्स बेकेट विद्यापीठातील संशोधकांनी स्पष्ट केले आहे. इतरांबरोबर अनेक वेळा त्यांना भावना व्यक्त करता येत नाहीत, तसेच त्यांना भेदभावाची वागणूक मिळते. त्यामुळे त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान दुखावतो असे अभ्यासकांनी विशद केले आहे. त्यामुळे इतरांच्या तुलनेत त्यांचे आत्महत्येचे प्रमाण अधिक असते, असे लँकास्टर विद्यापीठातील एलिझाबेथ मॅकडरमॉट यांनी स्पष्ट केले आहे.
समलिंगी व्यक्तींचे जे मानसिक आरोग्याबाबतचे जे प्रश्न आहेत त्याबाबत त्यांना फारशी मदत मिळत नाही, असे मॅकडरमॉट यांनी स्पष्ट केले. याबाबत ऑनलाइन प्रश्नावली भरून घेण्यात आली, त्यात काही धक्कादायक निष्कर्ष आहेत. त्यानुसार ६५ टक्के समलिंगी व्यक्तींनी इजा करून घेतली आहे, तर इतर व्यक्तींमध्ये हेच प्रमाण ४१ टक्के इतके आहे. शरीराला इजा करून घेण्याच्या वृत्तीमध्ये शरीराचा एखादा भाग कापणे, केस ओढणे, जाळून घेण्याचा प्रयत्न करणे औषधांचे अतिसेवन असे प्रकार केले जातात. ३५ टक्के समलिंगी विद्यार्थ्यांनी आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न केला तर बिगर समलिंगी विद्यार्थ्यांमध्ये हेच प्रमाण १४ टक्के इतके आहे. या संशोधनात इंग्लंडमधील दोन विद्यापीठातील ७०७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात विद्यार्थ्यांचे सरासरी वय २३ इतके होते. यामध्ये ११९ विद्यार्थ्यांनी समलिंगी असल्याची आपली ओळख सांगितली.