Benefits Of Strawberry Leaves: १०० रुपयांचा वाटा अशी मिळणारी लाल, रसाळ स्ट्रॉबेरी सगळ्यात आधी डोळ्याला भावते. चवीला प्रत्येकाला आवडेलच असं नाही पण तरी स्ट्रॉबेरीचे असंख्य फायदे हे सर्वमान्य आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, फक्त स्ट्रॉबेरीच नव्हे तर त्याची पानं सुद्धा आरोग्यासाठी खूपच गुणकारी ठरू शकतात. कॉन्टेन्ट क्रिएटर आणि हेल्थकेअर प्रोफेशनल डॉ करण राजन यांनी याविषयी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. डॉ. राजन सांगतात की, “जर तुम्ही स्ट्रॉबेरी खात असाल तर त्याची पानेही खा. स्ट्रॉबेरीचा वरचा भाग कॅलिक्स म्हणून ओळखला जातो आणि बेरीइतकेच त्याचे पौष्टिक मूल्य असते. स्ट्रॉबेरीच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल हे अँटिऑक्सिडंट व व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त, ते इतर पोषक तत्वांनी भरलेले असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह प्रशिक्षक कनिक्का मल्होत्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मल्होत्रा सांगतात की, स्ट्रॉबेरीसह पानेसुद्धा खाल्ल्याने दुहेरी फायदा मिळू शकतो. स्ट्रॉबेरीच्या पानांचे काही फायदे खालीलप्रमाणे..
व्हिटॅमिन आणि मिनरल बूस्ट: स्ट्रॉबेरीची पाने व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहेत, जी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे. याशिवाय स्ट्रॉबेरीच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे ए, के, लोह आणि कॅल्शियम सारखी खनिजे देखील असतात.
अँटिऑक्सिडंटचा पॉवरहाऊस: स्ट्रॉबेरीच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटिऑक्सिडंट्स सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात आणि आजारांचा धोका कमी करू शकतात. मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, स्ट्रॉबेरीची पाने अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहेत. सामान्यतः केल आणि पालकसारख्या पालेभाज्या अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहेत. तर काही अभ्यास असे सुचवतात की या दोन्ही भाज्यांच्या तुलनेत स्ट्रॉबेरीच्या पानांमध्ये काही विशिष्ट अँटिऑक्सिडंट्स, विशेषत: इलाजिक ऍसिडचे प्रमाण जास्त असू शकते.
रक्तातील साखरेचे नियमन: काही अभ्यासात असे दिसून आले आहे की, स्ट्रॉबेरीची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
पचनाला सहाय्य: स्ट्रॉबेरीचे पाने आहारात फायबर जोडतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. तसेच पोट स्वच्छ होण्यासही हातभार लागू शकतो.
स्ट्रॉबेरीच्या बऱ्याच जातींची पाने खाण्यायोग्य असतात, परंतु वापरासाठी एकही ‘सर्वोत्तम’ प्रकार नाही. पानांवरील कीटकनाशकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेंद्रिय, ताज्या स्ट्रॉबेरीची निवड करा.
फळांच्या तुलनेत स्ट्रॉबेरीच्या पानांची चव वेगळी असते. मल्होत्रा पुढे सांगतात, त्यात किंचित तुरट, गोड, चव असते तर पोत पालकापेक्षा पातळ असू शकतो. त्याचा वापर स्वयंपाकात कसा करता येईल हे पाहूया..
सॅलड्स: स्ट्रॉबेरीची बारीक चिरलेली पाने सॅलडमध्ये उत्तम चवीची जोड करू शकतात.
चहा आणि पेये: स्ट्रॉबेरीची पाने हर्बल चहासाठी उत्तम ठरतात.
सजावट: संपूर्ण किंवा चिरलेली पाने सजावटीसाठी वापरली जाऊ शकतात. त्यामुळे पदार्थाला सौम्य चव सुद्धा मिळू शकते.
हे ही वाचा<< ‘या’ एका सवयीमुळे घशात वाढू लागले केस; ५ सेमी लांब केस काढण्यासाठी मारल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या; हा आजार नेमका काय?
स्मूदी: मूठभर पाने तुमच्या स्मूदीमध्ये पोषक जोड देऊ शकतात.
लक्षात ठेवा, स्ट्रॉबेरीची पाने सामान्यत: सुरक्षित असली तरी, तुम्हाला कोणतीही ऍलर्जी असल्यास, आरोग्यसेवा तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.