How To Check Dehydration : प्रत्येक ऋतूनुसार आपल्या शरीरात बदल होत असतात. या काळात विविध प्रकारचे आजार बळवतात. विशेषत: हिवाळ्यात सर्दी, ताप किंवा फ्लूसारख्या आजारांचे प्रमाण अधिक असते. या काळात अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवते. कारण हिवाळ्यात तहान कमी लागत असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण देखील कमी असते. अशाने शरीरात पाण्याची प्रमाण कमी झाल्याने डिहायड्रेशनची स्थिती निर्माण होते. पण अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात.
डिहायड्रेशनमुळे डिसबॅलन्स आणि एनर्जीची कमतरता जाणवते. अशाने हार्ट, किडनी, ब्रेनसह अनेक अवयवांवर परिणाम होतात. अशात अभिनेत्री अनुष्का शर्माचे डायटिशिअन आणि ऑलिंपिक न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडिस यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात डिहायड्रेशन कसं ओळखायचं आणि जीवनशैलीत नेमके काय बदल करायचे याविषयीची माहिती दिली आहे.
रयानने पोस्ट करत लिहिले की, तुम्हालाही सतत थकवा जाणवतोय? त्वचा सैल झाली आहे? मूड खराब आहे का? याचं कारण डिहायड्रेशन असू शकतं. पण ही समस्या ओळखण्यासाठी तुम्ही ३ टिप्स वापरु शकता.
‘या’ ३ टिप्सनी ओळखू शकता डिहायड्रेशनची समस्या
१) स्किन पिंच टेस्ट
तुमच्या हाताच्या त्वचेला पिंक करा म्हणजे चिमटा काढा. यावेळी चिमटा काढल्यानंतर तुमची त्वचा हळूहळू पुन्हा मूळ स्थितीत येत असेल तर हे डिहायड्रेशनचे लक्षण आहे.
२) जिभेची टेस्ट
आरशात तुमची जीभ पाहा. जर जीभ कोरडी किंवा त्यावर पांढरा थर जमा झाला असेल तर याचा अर्थ तुम्ही कमी पाणी पीत आहात.
३) घाम आणि लघवीच्या रंगाची टेस्ट
जर तुम्हाला उन्हाळ्यात कमी घाम येत असेल आणि लघवीचा रंग गडद पिवळा होत असेल तर हेही डिहायड्रेशनची लक्षणे असू शकते.
डिहायड्रेशनच्या समस्येवर उपाय काय?
रयान फर्नांडिस यांनी सांगितले की, दररोज भरपूर पाणी प्या. दररोज किमान ८-१० ग्लास पाणी प्या. यावर हैदराबाद येथील ऑलिव्ह हॉस्पिटलमधील कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. अब्दुल मजीद खान यांनी म्हटले की, फक्त पाणी पिल्याने स्नायूंमध्ये पेटके येण्याची शक्यता वाढते, म्हणून पाण्याबरोबर इलेक्ट्रोलाइट्सचे सेवन केल्याने स्नायूंमध्ये वेदना आणि पेटके येण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.