नाजूक आणि पातळ फॅब्रिक असलेले कपडे किंवा खूप मळके कपडे वॉशिंग मशीनमध्ये नीट स्वच्छ धुतले जात नाहीत, त्यामुळे असे कपडे नेहमी हातानेच धुवावे लागतात. पण, हे कपडे हातांनी धुताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.अनेकांना मळके कपडे जास्त वेळ डिटर्जंटच्या पाण्यात भिजवून ठेवण्याची सवय असते. पण, अशाने कपडे लवकर खराब होण्याची भीती असते; तरीही अनेक लोक ही चूक करतात. अनेकांचा असा समज असतो की, डिटर्जंटमध्ये जास्त वेळ कपडे भिजत ठेवल्याने त्यावरील मळ लवकर निघतो. पण, तसे अनेकदा होत नाही; उलट कपड्यांची क्वॉलिटी खराब होते.
तुम्ही कपडे जास्त वेळ डिटर्जंटमध्ये भिजवून ठेवल्यास काय होते?
पाणी आणि डिटर्जंटने कपडे स्वच्छ निघतात यात शंका नाही, परंतु तुम्ही डिटर्जंटमध्ये जास्त वेळ कपडे भिजवले तर ते खराब होतात. यामध्ये प्रामुख्याने कपडे सैल होणे, रंग फिका पडणे, कपड्याला बारीक छिद्र पडणे यांचा समावेश होतो. याशिवाय कपडे धुतल्यानंतर त्यातून दुर्गंधी येण्याचीही शक्यता असते.
कपडे धुण्यापूर्वी ते किती वेळ भिजत ठेवावे?
कपडे धुण्यापूर्वी जास्तीत जास्त ३० ते ६० मिनिटे कपडे भिजवणे योग्य आहे. कपड्यांचे फॅब्रिक आणि त्यात असलेली घाण यावर अवलंबून ही वेळ बदलू शकते. उदाहरणार्थ, लेस असलेले कपडे फक्त दोन-तीन मिनिटे भिजवावे, रेशमी आणि लोकरीचे कपडे ३० मिनिटांपेक्षा जास्त पाण्यात भिजवू नयेत. त्याच वेळी कापूस आणि इतर कमी संवेदनशील कापड ६० मिनिटे पाण्यात भिजवले जाऊ शकतात.
कपडे पाण्यात भिजवण्यापूर्वी घ्या या गोष्टींची काळजी
कपड्यांवरील डाग पाण्यात भिजवण्यापूर्वी नेहमी स्वच्छ करा, तसेच डार्क रंगाच्या कपड्यांसह हलक्या रंगाचे कपडे कधीही भिजवू नका; यामुळे रंग लागून कपडे खराब होण्याची शक्यता असते.