Benefits of daily walking : जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही नियमित चालणे खूप जास्त फायदेशीर ठरू शकते. चालणे हे वजन कमी करण्यासह अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. पण, ६० मिनिटे म्हणजेच एक तास चालल्याने किती कॅलरीज कमी होतात, हे तुम्हाला माहितीये का? आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
इंडिया टीव्हीला दिलेल्या वृत्तात, फरिदाबाद येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉ. विनीत बंगा यांनी ६० मिनिटे चालण्याने किती कॅलरीज कमी होतात आणि त्याचे आरोग्यास काय फायदे आहेत, याविषयी सांगितले आहे.

६० मिनिटे चालल्याने किती कॅलरीज कमी होतात?

चालण्याने कमी होणाऱ्या कॅलरींची संख्या तुमच्या शरीराचे वजन, चालण्याचा वेग आणि तसेच तुम्ही कोणत्या प्रदेशात राहता, यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते.

जर तुम्ही मंद गतीने तीन ते चार किमी एका तासात चालत असाल तर २०० ते २५० कॅलरीज कमी होतात, जर तुम्ही मध्यम गतीने पाच ते सहा किमी एका तासात चालत असाल तर ३०० ते ४०० कॅलरीज कमी होतात आणि तुम्ही जर अतिशय वेगाने ७-८ किमी एका तासात चालत असाल तर तुमच्या शरीरातील ५००-६०० कॅलरीज कमी होतात.

चालण्याचे आरोग्यदायी फायदे

वजन कमी करण्यास मदत होते : वेगाने चालण्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात, ज्यामुळे वजन नियंत्रित राहते आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो.

हृदयाचे आरोग्य सुधारते : दररोज ६० मिनिटे चालण्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.

मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते : चालण्यामुळे शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हीटी वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

मानसिक आरोग्य चांगले राहते : चालण्याने मेंदूतील एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे तणाव, नैराश्य आणि एंग्झायटी कमी होते. मन शांत राहते आणि एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येते.

हाडे आणि सांध्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर : चालण्याने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांचा धोका कमी होतो. तसेच गुडघे आणि सांधेदुखी कमी होते.

प्रतिकारशक्ती वाढते : दररोज चालल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. सर्दी आणि इतर आजारांपासून सुरक्षित राहण्यास मदत होते.

चालण्याची सवय कशी लावायची?

दररोज कमीत कमी ३०-६० मिनिटे चालावे.
हळूहळू सुरुवात करावी आणि त्यानंतर हळूहळू वेग वाढवावा.
मॉर्निंग वॉकला अधिक प्राधान्य द्यावे; ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
उद्यान किंवा नैसर्गिक वातावरणात चालण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचे मनही शांत राहील.
जास्त वेळ चालणे शक्य नसेल तर ब्रेक घेऊन चालावे.

Story img Loader