Arranged Marriage: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून काही जण आपल्या प्रेयसी, प्रियकरासह लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत. तर काही जण लग्नासाठी सुयोग्य जोडीदार शोधत आहेत. खरंतर, लग्न अरेंज्ड मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज, लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघांचेही संपूर्ण आयुष्य बदलते. कोणत्याही पद्धतीने लग्न झाले तरीही नात्यात जोडीदारीची साथ, प्रेम, आदर आणि विश्वास असणे खूप गरजेचे असते; नाहीतर हे नाते टिकवणे खूप कठीण होऊन जाते.

परंतु, लव्ह मॅरेजमध्ये अनेक गोष्टींची जाणीव आपल्याला आधीपासून असते. सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात, त्यामुळे अशा लग्नात फसवणूक होण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु, अरेंज्ड मॅरेजमध्ये लग्नापूर्वी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पण, अशा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अरेंज्ड मॅरेजमध्ये लग्नाआधी किती वेळा भेटावे? (How many times should one meet before marriage)

अरेंज्ड मॅरेज लग्नांमध्ये लग्नाआधी भेटणे आवश्यक असते. भेटल्यानंतरच तुमचा भावी जोडीदार कसा आहे हे कळेल. काही लोक एकमेकांना दोन-तीन वेळा भेटल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतात, तर काहींना सहा-सात वेळा भेटल्यानंतरही हे समजत नाही की त्यांनी या नात्याला हो म्हणावे की नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

पहिली भेट

पहिल्या भेटीत शिक्षण, नोकरी, कुटुंब इत्यादी मूलभूत माहितीबद्दल बोला. याशिवाय तुम्हाला काय आवडते आणि काय आवडत नाही, जसे की तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, याबद्दल मत स्पष्ट करा. अशा भेटी नेहमी कॅफे, रेस्टॉरंट, पार्क अशा सार्वजनिक ठिकाणी करा.

दुसरी भेट

दुसऱ्या भेटीत करिअर योजना, जीवनशैली आणि भविष्याबद्दल बोला. सण आणि घरातील प्रथा, परंपरांबद्दल तुमचे विचार, चर्चा करा. तसेच घरातील लोकांबद्दल चर्चा करा.

तिसरी भेट

तिसऱ्या भेटीत तुमच्या जोडीदाराबद्दल असणाऱ्या अपेक्षा, स्वभाव, हास्य विनोद आणि गांभीर्य याकडे लक्ष द्या. कोणत्याही विषयावर बोला. दोघांच्या आवडी-निवडी जुळतायत की नाही याकडे लक्ष द्या.

चौथी भेट

चौथ्या भेटीत नोकरी, खर्च, बचत, गुंतवणूक, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य, भूतकाळाबद्दल काही प्रश्न असल्यास या विषयी चर्चा करा.

पाचवी भेट

पाचव्या भेटीत लग्नानंतर तुम्हाला हवे असणारे आयुष्य, स्वातंत्र्य, मनातील प्रश्न, या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करा. जर तुमचे बऱ्यापैकी विचार, मानसिकता जुळत असेल तर तुम्ही होकार देण्याच्या बाजूने निर्णय घेऊ शकता. परंतु, जर पाचव्या भेटीतही तुम्हाला विचारांमध्ये मतभेद जाणवत असतील तर हो म्हणण्याआधी विचार करा.