How much water should drink in summer : सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्स खूप महत्त्वाचे घटक असतात. याकडे थोडे जरी दुर्लक्ष केले तरी आरोग्य बिघडू शकते. शारीरिक क्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. किडनीचे कार्य कमी होते. पोषक तत्वांचे शोषण कमी होते आणि सांधे दुखी वाढते यामुळे आरोग्याच्या समस्या वाढताना दिसतात.
त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवू नये, याची विशेष काळजी घ्यावी. उन्हाळ्यात तुमच्या शारीरिक हालचालींनुसार शरीराला किती पाण्याची आवश्यकता आहे, ते जाणून घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात किती पाणी प्यावे?
या प्रश्नाचे उत्तर तुमच्या शारीरिक हालचालींवर अवलंबून आहे. तुम्ही जिथे राहता तेथील हवामान स्थिती आणि तुमच्या शरीराचे वजन यावर अवलंबून आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जास्त शारीरिक हालचाल म्हणजे शरीराला पाण्याची अधिक आवश्यकता जाणवणे, ज्यामुळे जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते. तसेच उष्ण हवामानामुळे शरीरावर घाम येतो ज्यामुळे जास्तीत जास्त द्रवपदार्थांचे सेवन करण्याची आवश्यकता भासते तसेच ज्या लोकांचे वजन जास्त आहे, त्यांनी हायड्रेटेड राहण्यासाठी जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते.
पाण्याचे सेवन
पुरुष: सर्व द्रवपदार्थांसह दररोज ३.७-४ लिटर पाणी प्यावे
महिला: सर्व द्रवपदार्थांसह दररोज २.७-३ लिटर पाणी प्यावे
याशिवाय, जर तुम्ही प्रकारची शारीरिक हालचाल करत असाल तर व्यायामाच्या एका तासात अतिरिक्त ०.५-१ लिटर पाणी प्यावे. जे खूप जास्त शारीरिक हालचाल करतात त्यांनी तीव्र व्यायामाच्या एका तासापूर्वी १-१.५ लिटर जास्तीचे पाणी प्यावे.
उन्हाळ्यात तुमचे हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्सची मात्रा एकूण तुमचे आरोग्य कसे आहे, हे ठरवते. विशेषतः भारतात, हायड्रेशनची मात्रा समजून घेणे आणि त्यानुसार पाण्याचे सेवन करणे, गरजेचे आहे.
उन्हाळ्यात पाणी पिण्याचे फायदे (Benefits Of Drinking Water )
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते : जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सर्वात आधी तुम्ही पुरेसे पाणी प्यावे. असे केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते.
मेंदूचे कार्य सुधारते : डिहायड्रेटड शरीर साधी कामेदेखील करू शकत नाही, कारण मेंदूवर हायड्रेशनचा मोठा परिणाम होतो. अभ्यासानुसार, थोडेसे डिहायड्रेशनदेखील मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकते.
शारीरिक क्षमता वाढविण्यास मदत होते : पाणी पिण्यामुळे शरीराला केवळ हायड्रेटेड ठेवता येत नाही तर दिवसभराच्या कामासाठी ऊर्जादेखील मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही दिवसभर चांगले काम करू शकता. जेव्हा शरीर पूर्णपणे हायड्रेटेड असते, तेव्हा शारीरिक हालचालीतदेखील सुधारणा होते.